गेला आठवडाभर श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाची पूर्वपीठिका आपण पाहिली. आज त्यांच्या बोधाचा मागोवा घ्यायला आपण सुरुवात करीत आहोत आणि योग असा की, आज त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांचा प्रारंभही आहे. सद्गुरू देहात दिसले तरी देहातीतच असतात. त्यामुळे श्रीगोंदवलेकर महाराज आजही आहेतच. पण स्थूल दृष्टीने बोलायचे तर श्रीमहाराजांनी देह ठेवून शंभर वर्षे उलटून गेली. त्यांनी देह ठेवला आणि त्यांचे म्हणविणारे आम्ही सर्वजण देहात, देहबुद्धी आणि देहासक्तीतच अडकून आहोत. त्यासाठीच हा बोध आवश्यक आहे. आपल्या बोधाची पूर्वपीठिका कोणत्या वाक्यावर आधारित होती? तर ‘मनुष्य म्हणून जन्मलेला माणूस, माणूस म्हणून मेला तर खरा’  थोडक्यात, माणसाला माणूस बनायची प्रेरणा देणारा, त्याला माणूस म्हणून घडविणारा आणि भगवंताच्या मार्गावर त्याला चालविणारा हा बोध आहे. त्यामुळे जोवर आम्ही देहबुद्धी आणि देहासक्तीतच अडकून आहोत आणि मनुष्य देहात असूनही पशूसारख्या सवयी-प्रवृत्तीतही अडकून आहोत तोवर हा बोध कधीच कालबाह्य़ होणार नाही. आता प्रश्न असा की, मनुष्य म्हणून जन्मलेल्या जिवाला माणूस बनण्याच्या आड येतं तरी काय?  तर आपल्या आड आपणच येतो! मोह आणि भ्रमाचं खत घालून आपला ‘मी’पणा, अहं आपण आयुष्यभर पोसत असतो, तोच आपल्या माणूसपणाआड येतो. षड्विकार आणि अनंत वासना या त्याच्या छटा आहेत. या वासनेनं माखलेल्या माणसाला निर्वासन करून भगवंताकडे वळवायचं, ही फार कठीण गोष्ट. ती सद्गुरू करीत असतात. त्यासाठी भगवंतमय जीवन जगायची प्रेरणा ते देत असतात. माणूस मात्र या ‘अहं’च्या नादात स्वतला स्वतंत्र, कर्तृत्ववान मानत असतो. प्रत्यक्षात तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र नसतो. श्रीमहाराज म्हणतात, ‘पशुपक्ष्यांपेक्षा माणूस परतंत्र आहे. भगवंत पाठीराखा असला तरच जीवन सुखाने जगता येईल.’ (बोधवचने, अनुक्रमांक २८०) आपण माणसाला स्वतंत्र मानतो आणि पशुपक्ष्यांना परतंत्र. पण महाराज तर सांगतात माणूस पशुपक्ष्यांपेक्षा परतंत्र आहे जर भगवंताचा आधार त्यानं घेतला तर तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र होईल, सुखानं जीवन जगू लागेल! हे कसं? यासाठी पशुपक्ष्यांच्या जगण्याकडे आणि माझ्या जगण्याकडे मी बारकाईने पाहिलं तर याचं उत्तर मिळेल. तुरळक अपवाद सोडले तर भूक लागल्याशिवाय पशुपक्षी खाद्याची तजवीज करीत नाहीत. निसर्गाशी एकरूप होऊन जीवनाच्या प्रवाहात स्वतला विनातक्रार झोकून ते जगत असतात. प्रत्येक क्षणी त्या क्षणाच्या गरजेनुसार ते जीवनाला सामोरे जात असतात. माणूस तसा निर्धास्त जगत नाही. त्यात भर म्हणजे माणसाला मन आणि बुद्धीचं दान मोठं आहे आणि त्यामुळे अनेक क्षमता जशा त्याला लाभल्या आहेत तसेच अनेक सापळेही त्यानेच निर्माण केले आहेत.