भारतीय संगीतात काही तरी नवे करायचे म्हणून जे बदल झाले, ते सगळेच काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत. ज्यामध्ये भविष्याचा वेध होता आणि समाजमनावर टिकून राहण्याची ताकद होती, असे बदल आपोआप स्वीकारले गेले. सर्जनशील कलावंत संगीतात नवववे प्रयोग करीत राहिल्याने, त्याची स्वतंत्र प्रयोगशाळा तयार झाली. त्यातील नवे शोध पुढच्यांना प्रेरक ठरले आणि त्यातून नवनिर्मितीचीही एक अखंड परंपरा सुरू झाली..
श्रीकृष्णाची बासरी ही जर भारतीय संगीताची पहिली दृश्य खूण मानली, तर गेल्या पाच-सहा हजार वर्षांत येथील संगीताने किती वाटावळणे पार केली आणि त्या बदलाचा वेग किती संथ होता, हे सहजपणे लक्षात येईल. लोकसंगीतातून संगीताने त्या त्या काळाच्या परिघात जी आधुनिकता धारण केली, तिने त्या संगीताबद्दलचा कलावंतांचा विचार प्रकट होण्यास मदत झाली. जनसामान्यांच्या गळय़ातून विविध प्रसंगांमध्ये गायले जाणारे संगीत हे बव्हंशी लोकप्रिय संगीत होते. ते सुलभ होते आणि त्याची काठिण्यपातळीही फार नव्हती. गाण्याची इच्छा असणाऱ्या कुणालाही सहजपणे गाता येईल, असेच ते संगीत होते. सामान्यत: लोकसंगीतातील स्वररचनांमध्ये गुंतागुंत असत नाही. ते सहजसोपे आणि तरीही भावपूर्ण असते. त्यातून काही सांगीतिक विचार व्यक्त होण्याची अपेक्षा नसली, तरीही ते संगीत सामान्यांच्या मनातले काही सांगणारे असते. कारुण्य आणि उत्फुल्लता व्यक्त करण्यासाठी स्वररचनांमध्ये अमुक असे करावे लागते, अशा अटी न पाळताही ते संगीत त्या त्या भावना पुरेशा प्रमाणात व्यक्त करू शकत असले पाहिजे. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचणाऱ्या संगीतात कालानुरूप बदल झाले नसतीलच असे म्हणता येणार नाही. पण त्या संगीताचा गाभाच पूर्णपणे बदलला गेला नाही, असेही लक्षात येते. अगदी ‘ऐलमा पैलमा गणेशदेवा’ हे भोंडल्याचे गाणे गेले किमान शतकभर त्याच पद्धतीने गायले जाते आहे. या सगळय़ा कालखंडात लोकसंगीतातून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडलेल्या संगीताचा त्यावर फारसा परिणाम झाला नाही. रोजच्या जगण्यातले बदल आणि त्यावर होणारी विविध प्रकारची आक्रमणे झेलतानाही लोकसंगीतातील अशी अनेक गाणी जशीच्या तशी राहिली. भोंडल्याच्या गाण्यात केवळ शब्दांची मजा नाही, त्यात स्वरवैविध्यही आहे. चालीची म्हणून काही सुंदर वळणे आहेत. लोकसंगीतानेही आपली परंपरा अशी मौखिक स्वरूपातच सांभाळली. या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या नाहीत की अल्बम झाले नाहीत, पण तरीही ती टिकून राहिली. कारण सामाजिक सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग म्हणूनच त्याच्याकडे पाहिले गेले.
संगीत हे स्वतंत्र बेट नसते आणि तेथील बदलांचे कारण संगीतबाहय़च असते, हे अनेकदा अनुभवायला मिळते. सांस्कृतिक बदलांचा परिणाम जसा जगण्यावर होत असतो, तसाच माणसाच्या आवडीनिवडीवरही होत असतो. वर्षांनुवर्षे एकाच संस्कृतीमध्ये कोणीच राहत नसते, याचे कारण माणसामधील सतत नवे काही शोधण्याची प्रवृत्ती. पाच-सहा हजार वर्षांपूर्वीचा माणूस ज्या परिस्थितीत राहत होता, ती आमूलाग्र बदलण्यात माणसाला यश आले. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळा परिसर बदलून टाकला. आधुनिकतेचा हा ध्यास त्याला कायम अस्वस्थ करीत राहतो आणि तो सतत काही नवे आणि चिरंजीवी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा असेही लक्षात येते, की जे टिकून राहावे, म्हणून निर्माण होते, तेही बदलाच्या रेटय़ाखाली मूळ अवस्थेत राहू शकत नाही. बदलांमुळे आवडीनिवडीवर होणारा परिणामही त्याला कारणीभूत असतो. के. एल. सैगल किंवा के. सी. डे यांच्या ज्या गाण्यांनी एक काळ सगळा देश वेडा झाला होता, ती गाणी स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या कुणालाही आधुनिक वाटत नाहीत. एवढेच काय, ती त्यांना फारशी आवडतही नाहीत. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का’ या गाण्याने आजच्या मराठी तरुणाला अजिबात भुरळ पडत नाही. काळाच्या संदर्भात ती गाणी अतिशय टवटवीत आणि आधुनिक वाटावीत, अशी होती. पण आधुनिकतेनंतरची उत्तर आधुनिकता आणि त्यानंतरची उत्तर उत्तर आधुनिकता जे बदल घडवत असते, त्याचा कलावंतांबरोबरच रसिकांवरही परिणाम होतच असतो. आपल्या आजोबांना जे आवडत होते (म्हणजे त्यांच्या काळात जे आधुनिक होते), ते आज ‘पौराणिक’ वाटावे, इतके जुनेपुराणे वाटू लागते. बदलांचा हा वेग गेल्या पाच हजार वर्षांमध्ये संथ होता आणि त्याने स्वातंत्र्यानंतरच्या काळात कमालीचा वेग पकडला. त्यातही जागतिकीकरणाच्या घडामोडींनंतर तो अधिकच वाढला.
इतिहासाच्या अल्प नोंदींमुळे काळाच्या तुकडय़ांमध्येभारतीय संगीतात कसकसे बदल होत गेले, हे समजणे अवघड आहे. सामवेदातील उल्लेखांनंतर थेट प्रबंध गायकी, ध्रुपद आणि ख्याल गायकीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे प्रबंध गायकीच्या अस्सल रूपाची आपल्याला कल्पना करावी लागते. सुदैवाने ध्रुपदाची परंपरा आजही आपले अस्तित्व टिकवून असल्यामुळे त्याचे स्वरूप समजून घेणे शक्य होते. ख्याल गायकीमधील स्थित्यंतरांची माहितीही अशीच परंपरेने झिरपत आलेली. बदलांची ही साखळी घडत असताना अनेक प्रतिभावंतांनी त्यात प्रचंड योगदान दिले. काही तरी नवे करायचे म्हणून जे बदल झाले, ते सगळेच काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत. ज्यामध्ये भविष्याचा वेध होता आणि समाजमनावर टिकून राहण्याची ताकद होती, असे बदल आपोआप स्वीकारले गेले. काही काळापुरते ते स्थिरावलेही. स्थिरावलेल्या बदलांमध्येही नव्या बदलांची बीजे शोधणाऱ्या सर्जनशील कलावंतांसाठी तेही एक आव्हान ठरले. या सगळय़ा परिस्थितीत भर पडली, ती आजूबाजूला घडत असलेल्या अनेक नव्या घटनांची. सामाजिक चौकटींची मोडतोड होत नव्याने बांधणी होत असते. आर्थिक आणि राजकीय परिस्थितीही आपापल्या पातळीवर अनेक युद्धांना सामोरी जात असते. हे सारे बेटावर घडू शकत नाही. समाजाच्या घट्ट विणलेल्या विणीतून ते बदल बाहेर येण्याच्या प्रयत्नात असतात. लोकसंगीतातून बाहेर पडून सामूहिक संगीताच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न संगीताने केला, त्याच वेळी कंठसंगीताच्या पलीकडे जाऊन संगीत व्यक्त करण्याचे आणखी काही मार्ग शोधण्याचाही प्रयत्न सुरू राहिला. वायुवाद्य असलेल्या बासरीच्या बरोबरीने वीणा, सतार, सरोद यांसारख्या तंतुवाद्यांची निर्मिती हे वैज्ञानिक आव्हान होते. पखवाज, मृदुंग आणि तबला यांचेही शास्त्रीय पातळीवरील आव्हान त्या वेळच्या कलावंतांपुढे होतेच. कलेच्या ध्यासाबरोबरच वाद्यनिर्मितीसाठीचे विज्ञानही तेव्हा कलावंतांच्या ठायी होते. वाद्यातून अभिजात संगीताचा आविष्कार करणे हे तर सर्वात अवघड काम होते. परंपरांचा आधार घेत, त्यातील कलात्मकतेला बाधा येऊ न देता नवे काही घडवणे हे त्यामुळेच अतिशय कठीण होते. वैज्ञानिक प्रयोगशाळा त्यासाठी उपयोगाच्या नव्हत्या. त्यासाठी आवश्यक होत्या कलांच्या प्रयोगशाळा. प्रत्येक कलावंत एकेकटय़ाने असे नवे प्रयोग करीत राहिल्याने, त्याची स्वतंत्र प्रयोगशाळा तयार झाली. त्यातील नवे शोध पुढच्यांना प्रेरक ठरले आणि त्यातून नवनिर्मितीचीही एक अखंड परंपरा सुरू झाली.
कलांच्या या प्रयोगांमध्ये सौंदर्य केंद्रस्थानी होते. ‘असे करून पाहू या,’ असे म्हणून काही नवे घडत नाही. ते करून पाहायचे आहे, त्यातील सौंदर्याचा केंद्रबिंदू सापडल्याशिवाय ते घडतही नाही. त्यामुळे कलावंत हा आयुष्यभर सौंदर्यनिर्मितीच्या शोधात असतो. त्याची म्हणून स्वत:ची एक सौंदर्यदृष्टी असते. तिला पूर्वसुरींचा आधार असतो हे खरे. मात्र स्वप्रतिभेला साद घालून त्यातील सौंदर्यतत्त्वाला सामोरे जाताना होणारी घालमेल रसिकापर्यंत पोहोचत नाही. बदल घडत असताना, ते ठरवूनच होतात, असेही घडत नाही. कारण कलेकडे पाहण्याची नजर प्रत्येक कलावंताला नवसर्जनासाठी उद्युक्त करीत असते. सगळेच अशा कलांच्या प्रयोगशाळांमध्ये रमत नाहीत. काही जण यशस्वी ठरलेल्या प्रयोगांचेच पुन:पुन्हा प्रयोग करीत राहतात. काळाच्या पडद्यावर स्वत:चा अमिट ठसा उमटवण्याची ऊर्जा असणारे कलावंत संख्येने कमी असतात. त्यांचे कलात्मक भांडण एकाच वेळी स्वत:शी आणि काळाशी असते. त्यांचे सगळेच प्रयोग हमखास यशस्वी होत नाहीत आणि त्यांना त्याची तमाही नसते. आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर ठेवत त्याचे कलांवर होणारे परिणाम टिपणे आणि आत्मसात करणे हे फार उच्च दर्जाच्या बुद्धिमंतांचे काम असते. भारतीय संगीतात असे बुद्धिमंत वेळोवेळी तयार झाले. त्यांनी आपल्या प्रयोगांना निर्भीडपणे रसिकांसमोर ठेवले. सारे आयुष्य ज्या कलानंदासाठी वेचायचे, तो आनंद एकाच वेळी आतून आणि बाहेरून घेण्याचे भाग्य मिळणाऱ्या अशा कलावंतांनीच तर नव्याची वाट निर्माण केली. ही वाट मळकट होत पुसून जायच्या आत त्यावरून पुढच्या पिढीतला कुणी कलावंत वाटचाल करायला लागतो. जगातल्या सगळय़ाच संगीतामध्ये कलांच्या या प्रयोगशाळांनी अपूर्व कामगिरी केली. त्या प्रयोगशाळा जिवंत ठेवणे आणि त्यातील टवटवीतपणा अजिबात कोमेजणार नाही, याची काळजी मात्र समाजानेच घ्यायला हवी.