वनस्पतींना संवेदना असतात हे प्रथम  जगदीशचंद्र बोस यांनी सांगितले. नंतर वनस्पतींवर अनेकदा रोग, संसर्गजन्य रोग पडतात हे लक्षात आले. बऱ्याचदा निम्मे पीक रोगांमुळे हाती येत नाही त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून कीडनाशकांचा वापर केला जातो, पण तो पर्यावरणस्नेही नाही. वनस्पतींच्या रोगांच्या निदानाचेही शास्त्र असते. या शास्त्रातील एक वैज्ञानिक म्हणजे वनस्पतींचे डॉक्टर असलेल्या माइक थ्रेश यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८४ वर्षांपैकी त्यांनी साठ वर्षे वनस्पतींचे रोगनिदान या एकाच विषयावर काम केले.
जॉन मायकेल थ्रेश यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३० रोजी उत्तर इंग्लंडमधील शेतकरी कुटुंबात झाला होता, त्यामुळे वनस्पतींविषयी त्यांना प्रेम होते. त्यात कसावाबाबत अधिकच. पश्चिम आफ्रिकेत कोकोच्या पिकांवर आढळणाऱ्या विषाणूचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम त्यांनी केले. १९५० च्या सुमारास घाना व नायजेरियात कोकोवरील विषाणूने असाच संसर्ग पसरवला होता त्या वेळीही त्यांनी संसर्गित झाडांच्या तीस मीटर अंतरावरील निरोगी झाडे काढून ती इक्वेडोरमध्ये नेऊन लावली, त्यानंतर अ‍ॅमेलोनाडो कोको ही संकरित प्रजात तयार करून त्या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही अशी व्यवस्था केली. आपण बर्ड फ्लू किंवा स्वाइन फ्लूमध्ये ‘क्वारंटाइन’ हा शब्द वाचला असेल, म्हणजे रोगाचा प्रसार टाळण्यासाठी त्या रुग्णाला वेगळे ठेवले जाते, तेच तंत्र त्यांनी वनस्पतींमधील रोगांच्या साथीवर वापरले. विषाणूमुक्त कोकोची प्रजात तयार करून त्यांनी त्यांचे क्लोनही तयार केले होते. १९८८ मध्ये युगांडात कसावा रोपांवर विषाणूंचा संसर्ग झाला तेव्हाही त्यांना पाचारण करण्यात आले, त्या वेळी कसावा मोझॅइक विषाणूने धुमाकूळ घातला असताना त्यांनी रोगग्रस्त झाडे नष्ट करून त्या रोगाची साथ रोखली. नंतर विषाणूप्रतिबंधक संकरित अशी कसावाची प्रजात तयार केली. कसावा हे आफ्रिकेतील ५० कोटी लोकांचे पूरक अन्न आहे, त्यासाठी त्यांना गोल्डन कसावा पुरस्कारही मिळाला होता. ते ब्रिटिश सोसायटी फॉर प्लँट पॅथॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष, ग्रीनविच विद्यापीठात ते नॅचरल रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट या संस्थेत वनस्पती विषाणूशास्त्राचे प्राध्यापक होते. पिकांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगांवर त्यांनी लंडन विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी घेतली होती. जगातील चाळीस देशांत त्यांनी पिकांवरील रोगांवर काम करून एक प्रकारे दारिद्रय़ दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकूण २०० शोधनिबंध व आठ पुस्तके लिहिली होती.