संगीत ही श्रवणाची कला. ऐकून समजून घ्यायची आणि कलावंताने चुकूनमाकून निरूपण केलेच, तर त्यातील खोलीची व्याप्ती उमगून घ्यायची. भारतीय अभिजात संगीताच्या प्रदीर्घ आणि संपन्न परंपरेत त्याचे शास्त्र आणि त्यातील सौंदर्य पुढील पिढय़ांपर्यंत गुरुमुखातूनच पोहोचले. संगीतावर लिहिणे आणि त्याचे रसग्रहण करणे या गोष्टींपासून संगीत सातत्याने दूरच राहिले. याचे एक कारण असे असावे की, कलावंताने कलेत मश्गूल व्हावे, तिच्या विश्लेषणाचा भार घेऊ नये, असे सूत्र आपल्या संगीतकारांनी मान्य केले. सामवेद हा संगीतावरील सुरुवातीचा लिखित पुरावा. मात्र त्यानंतर काळाच्या विविध टप्प्यांवर संगीताला शब्दांत पकडून ठेवण्याचा प्रयत्न क्षीणपणे का होईना, पण होत राहिला. डॉ. मोहन नाडकर्णी यांच्यासारख्या मर्मज्ञ संगीत विश्लेषकाचे महत्त्व यासाठी, की त्यांनी भारतीय संगीत परंपरेला इंग्रजीतून पाश्चात्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाच दशके ते संगीतावर सातत्याने लिहीत राहिले आणि ते लेखन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असले, तरी त्यात टिकाऊपणाचा बराच अंश होता. एखाद्या कलावंताच्या एखाद्या मैफलीवरचे रसग्रहण म्हणजे त्या एक वेळच्या अनुभवाचे सार. नाडकर्णी यांच्या लेखनात कलावंत, त्याची सांगीतिक परंपरा आणि त्याच्या अभिव्यक्तीतील अस्सलपणा, याकडे लेखनात लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ते लेखन एका मैफलीचे वर्णन राहात नसे, तर संगीताचा समग्र अवकाश पकडणारे असे. पंडित रविशंकर यांनी पाश्चिमात्यांना भारतीय संगीताची गोडी लावली, हे खरे. परंतु या संगीताची खुमारी समजून सांगण्यासाठी त्या काळात मोहन नाडकर्णी यांच्यासारखा संगीताचा रसग्राहक होता, हे विसरून चालणार नाही. केवळ वृत्तपत्रीय लेखन न करता त्यांनी ग्रंथसंपदाही निर्माण केली. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यावर त्यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक हे त्याचे एक उदाहरण. भीमसेनजींच्या कर्तृत्वाला सातासमुद्रापार नेण्याची किमया त्यांच्या स्वरांनी केलीच, पण तिथल्या बुद्धिमंतांना त्याचा अर्थ नाडकर्णीनी समजावून सांगितला. संगीताचे अधिकृत शिक्षण मिळालेले नसतानाही नाडकर्णी यांनी शास्त्रीय संगीतावर सुलभ लेखन करण्यात यश मिळवले, याचे कारण त्यांना या कलेत असलेली रुची. संगीत हे केवळ श्रवण करून सोडून देण्याची गोष्ट नव्हे, तर ते समजावून घेतल्यास, अधिक चांगल्या रीतीने ते पोहोचू शकते, यावर त्यांचा भर होता. संगीतावर लिहिणाऱ्या अगदी मोजक्या लेखकांमध्ये गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, कृ. द. दीक्षित, वामनराव देशपांडे यांनी मोलाची भर घातली. नाडकर्णी यांनी इंग्रजीतून लेखन करून भारतीय सांगीतिक अस्तिमेची उलगड अधिक व्यापक प्रमाणात केली असे म्हणायला हवे. हवेत विरणाऱ्या स्वरांना शब्दबद्ध करणाऱ्या नाडकर्णी यांचे निधन ही त्यामुळे दु:खकारक घटना आहे.