पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी अर्थातच, राज्य पोलीस दलातील अनेक अधिकारी नियुक्त आहेत. पण त्यात निराळ्या ठरतात जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरल्या अधिकारी मनजीत कौर. या अख्ख्या सुरक्षा पथकात त्या एकटय़ाच महिला आहेत म्हणून केवळ नव्हे, तर पोलीस अधिकाऱ्याने कसे असावे याचा आदर्श म्हणूनही. अ‍ॅथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या मनजीत कौर चपळ तर आहेतच, पण स्पर्धात्मक क्रीडा प्रकारात केवळ चापल्य असून भागत नाही. मनाची एकाग्रता, आत्ता आणि इथे काय महत्त्वाचे हे ठरवण्याची- चटकन निर्णय घेऊन तो अमलात आणण्याची क्षमता आणि ‘रिले’सारखा सांघिक क्रीडा प्रकार असेल तर सहकाऱ्यांना उत्तम साथ देण्याची तयारी आणि इच्छा, हे सारे महत्त्वाचे ठरते. ही साथ देताना केवळ स्वत: उत्कृष्ट असून भागत नाही, इतरांची ऊर्जाही वाढवावी लागते.
धावण्याच्या रिले शर्यतीत- ‘चारदा ४०० मीटर’ या प्रकारात – अन्य तिघींसह २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धेतही (एशियाड) सुवर्णपदक पटकावलेल्या मनजीत कौर यांना हे सारे कठीण नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा कडय़ाची जबाबदारी सांभाळतानाच त्या पथकाचे नेतृत्वही करण्याइतके गुण मनजीत यांनी आधीही सिद्ध केलेले आहेत. पंजाबच्या हत्यारी पोलीस दलात (पंजाब आम्र्ड पोलीस) निरीक्षक म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली, त्याच वेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धाची दारे त्यांच्यासाठी एकामागोमाग खुली होऊ लागली होती. या सेवेच्या पहिल्या पाच वर्षांत, म्हणजे २००६ ते २०१० या काळात त्यांनी धावपटू म्हणून अनेक बक्षिसे, अनेक पदके आणि मानचिन्हे मिळवली. आजघडीला मनजीत २८ वर्षांच्या आहेत. तिशीकडे झुकताना, खेळाऐवजी पोलीस सेवेकडे लक्ष केंद्रित करावे लागणार याची जाणीव त्यांच्या देहबोलीतही दिसू लागली आहे. मात्र क्रीडा-सराव त्यांनी सोडलेला नाही. मैदानावरील सरावाखेरीज, उद्वाहनाऐवजी पायऱ्यांची चढउतार करण्याचे पथ्यही त्या पाळतात.
मनजीत यांच्यासह पाच ‘अर्जुन पुरस्कार’विजेत्या निरीक्षकांना पंजाब पोलीस दलाने ऑक्टोबर २०१२ मध्ये बढती दिली. क्रीडास्पर्धाच्या सरावासाठी परदेशी जाण्यास २५ लाख रुपयांची मदत या पोलीस दलानेच केली आणि क्रीडा नैपुण्य हाही कामाचा भाग मानला. याबद्दलचा कृतज्ञभाव ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी व्यक्त केलाच, पण मितभाषी आणि कामावरच लक्ष असलेल्या मनजीत या काही प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन मोठय़ा होणाऱ्यांपैकी नव्हेत, हेही याच प्रश्नोत्तरांतून स्पष्ट झाले.