‘जलस्वेव जयामहे’ या इंडोनेशियन नौदलाच्या घोषवाक्याचा जोरकस पुनरुच्चार करून, १३००० बेटांच्या या देशाला सशक्त बनवण्यासाठी सागरी ताकद वाढवण्याचा नारा देऊन जोको विडोदो यांनी सोमवारी- २० ऑक्टोबर या ठरलेल्या तारखेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. या पदावरील त्यांची निवड मार्चमध्येच घोषित झाली असली, तरी प्रथेप्रमाणे शपथविधी सहा महिन्यांनी झाला. इंडोनेशियाच्या ६७५ सदस्यांच्या कायदेमंडळात पूर्ण बहुमत नसतानाही, त्या सदनाचे आणि देशाचे कप्तानपद ‘जोकोवि’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विडोदोंकडे आले आहे.
जावा बेटावर जन्म (१९६१), याच बेटावरील सरकारी प्राथमिक शाळेत आणि सुराकार्ता नगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण, पदवीदेखील वन-विद्या (फॉरेस्ट्री) या शाखेची आणि त्यानंतर नोकऱ्या व स्वतचा व्यवसाय, असे साधे- काहीसे खडतरच- पूर्वायुष्य जोकोवि यांची ओळख ‘इंडोनेशियाचे ओबामा’ म्हणून रुजण्यास पुरेसे होते. ते जेथे शिकले, वाढले, त्याच सुराकार्ता शहरातील गरिबांसाठी स्वस्त घरबांधणी कशी करता येईल याचा कार्यक्रम त्यांनी आखला आणि त्या बळावर, ‘इंडोनेशिया लोकशाही पक्ष- संघर्षवादी’ या पक्षाने त्यांना या सुराकार्ताचे नगराध्यक्षपद देऊ केले. घरबांधणी ‘करून दाखवल्या’वर प्रांतपातळीला, जकार्ताचे गव्हर्नर म्हणून त्यांनी नेतृत्व केले. ही गोष्ट दोन वर्षांपूर्वीची, २०१२ च्या सप्टेंबरातली. तेव्हापासून लोकप्रियतेच्या लाटेवरच राहिलेले आणि ‘लोकांचे उमेदवार’ म्हणूनच सतत चर्चेत असलेले जोकोवि, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असणे हे साहजिकच मानले गेले.. त्यांची राजकीय कारकीर्द कमी आहे, याकडे कोणीही पाहिले नाही. अर्थात, ही निवडणूक त्यांना सोपी गेली नाही आणि त्यांची निवड निर्विवाद झालेली नाही, असे आकडे सांगतात.. पण हा झाला सहा महिन्यांपूर्वीचा इतिहास. शपथविधीच्या दिवशी इंडोनेशिया जोकोवि-मय झाला होता! जोकोविंच्या आवडत्या ‘हेवी मेटल’ संगीताची मैफल राजधानीच्या जकार्ता शहरात दिवसभर सुरू होती.
‘हा नेता म्हणजे आपला शेजारीच जणू’ ही राजकीय कारकीर्दीत आजवर उपयोगी पडलेली प्रतिमा जोकोविंना पुढेही जपायची आहे. पत्नी, दोन्ही मुली, मुलगा यांनीही कपडे, हौसमौज यांचे प्रदर्शन आजवर टाळले आहे. आई ७१ वर्षांच्या, त्या ‘इकॉनॉमी क्लास’नेच प्रवास करून जोकोविंकडे आल्या याची कोण चर्चा झाली! आधीचे अध्यक्ष सुसिलो युधोयोनो यांची गेल्या १५ वर्षांची छानछोकीची आणि भ्रष्टाचारी कारकीर्द पाहता हे सारे नवे आहे. या साधेपणामुळेच कदाचित, जोकोवि यांच्या शब्दाचे वजन कायम आहे आणि ‘सागरी शक्ती वाढवा’ या आवाहनाचा रोख चीनवर होता की थेट ऑस्ट्रेलियावर, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.