नोबेलसाठी नाव चर्चेत आलेले पहिले तुर्कस्तानी लेखक म्हणून पाश्चात्त्य जगाला यासर केमाल यांचे कौतुक.. पण भारत किंवा महाराष्ट्राला, ‘आधुनिक तुर्कस्तानातील पहिले ग्रामीण कथाकार’ म्हणून त्यांच्याकडे अधिक डोळसपणे पाहता यावे, अशी त्यांची लेखकीय कारकीर्द होती. मराठीत ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’ या टप्प्यानंतर चौथी ग्रामीण पिढी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आली आहे.. हा साधारण १९४० च्या दशकापासून ते आजवरचा काळ.. या सर्व काळात यासर केमाल लिहीत राहिले होते! तुर्कस्तानात आधुनिक साहित्याचीच भूमी नांगरणारे आणि ‘ग्रामीण’ म्हणून वेगळे न पडलेले, असे त्यांचे स्थान होते.
१९२३ साली यासर यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव यासर सादिक गोकेली.  गरीब घरातील यासर शालेय शिक्षणही पूर्ण करू शकले नाहीत; पण शब्द त्यांना खुणावत राहिले. सक्तीच्या लष्करी प्रशिक्षणासाठी गेले असता गावोगाव हिंडून, ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीदरम्यान त्यांनी लोकगीते एकत्र केली होती.  मग कथालेखन सुरू झाले; पण खायची ददात असल्याने कधी शेतमजूर, कधी औद्योगिक कामगार, फावल्या वेळेत अशिक्षितांचा लेखनिक म्हणून आणखी चार लिरे (तुर्की चलन) कमावणे, अशी यासर यांची विशी गेली. तिशीत मात्र ते पत्रकार झाले होते. त्यांची पहिली कादंबरी १९५५ मध्ये प्रकाशित होऊन १९६१ साली ‘मेमद, माय हॉक’ या नावाने इंग्रजीत आली. तेव्हाच्या इंग्रजी वाचकांना ती रॉबिनहूड पद्धतीची रोमांचक कथा वाटली होती; कारण कथानक होते गावच्या जमीनदाराच्या छळाला आव्हान देणारा तरुण, अखेर जमीनदाराची सद्दी संपवतो, असे. यासरना वाटणारे साम्यवादी रक्तरंजित क्रांतीचे आकर्षण, इथे हिंसेतून आले होतेच.. पण नायकाची प्रेयसीदेखील जीव गमावते, अशा शेवटामुळे हिंसेचे समर्थन मात्र नव्हते. लोकांच्या साधेपणाला मिळणारी आव्हाने आणि रोजच्या जीवनचक्रातच अडकलेले लोक यांचे भेदक चित्रण हे यासर यांचे खरे बलस्थान, हे त्यांच्या पुढील सुमारे ३० कादंबऱ्यांच्या इंग्रजी भाषांतरांतून जगाला कळले.. ‘आयर्न अर्थ कॉपर स्काय’, ‘ड्रमिंग आउट’, ‘द व्हाइट हँकरचीफ’, ‘द फील्ड ऑफ डेथ’, ‘टु क्रश द र्सपट’ ही त्यापैकी काही गाजलेल्या भाषांतरांची नावे.
‘‘मी विशिष्ट वाचकवर्गासाठी तर लिहीत नाहीच, पण स्वत:साठी वगैरेसुद्धा लिहीत नाही. लिहावे लागतेच.’’ अशा शब्दांत समाजाचे देणे सांगणारे यासर शनिवारी निवर्तले. त्यांचा अंत्यविधी २ मार्चला सोमवारी झाला.