पीओपीची गणेशमूर्ती तीन महिने उलटले तरी पाण्यात सुमारे जशीच्या तशी होती, हे प्रयोगातून दिसले. तिच्या  कृत्रिम रंगांचा नैसर्गिक परिसंस्थांवर अनिष्ट परिणाम होणारच, हेही उघड. तरीही आपण आग्रही कसे काय?

पर्यावरणस्नेही गणेशविसर्जन करायचे म्हटले तर कोणती पथ्ये पाळावी लागतील याची चर्चा गेल्या लेखात आपण केली (रविवार, ११ सप्टें.). गणेशोत्सवातील इतर कृतींचा विचार निसर्ग-पर्यावरणाच्या चष्म्यातून करण्यासाठी हा लेख. महाराष्ट्रात गणेशोत्सवांमधून वर्षांनुवर्षे वैचारिक अभिसरण झालेले आहे. समाजधारणेसाठी आवश्यक असणारी चिरंतन मूल्ये, सामाजिक समस्यांबाबतचे जनजागरण व नृत्य, संगीत व इतर कलांचे प्रदर्शन करीत संपूर्ण समाज एकत्र आणून सौहाद्र्र व सद्विचारांची देवाण-घेवाण करणारी अनेक मंडळे भरीव कार्य करीत आहेत. त्यातील काहींनी ऐतिहासिक काम करीत शंभरीही गाठलेली आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन

घरगुती गणेशोत्सवात मात्र सामाजिक विचारापेक्षा धार्मिक भावना, व्रते व पूजा-अर्चा यांचा जोर आढळतो. पुरातन व्रत-वैकल्यांचा व एकविसाव्या शतकातील आधुनिक जाणिवांच्या संकरातून नवी दिशा शोधण्यापेक्षा कर्मकांड केंद्रस्थानी ठेवून श्रद्धेचे प्रदर्शन व जाहिरात करीत स्वतच्या वस्तीत प्रतिष्ठा प्राप्त करण्याकडे कल वाढतो आहे. परिणामत: साधेपणा व शुचिर्भूत वर्तनावरचे लक्ष कमी होत आहे व एकंदरच सवंगपणा व छचोरीचे वर्तन कौटुंबिक स्तरावरही आढळत आहे. घरातील वडीलधाऱ्यांची यासंबंधीची नाराजीसुद्धा नजरेआड व कानाआड करण्याकडे कल वाढताना दिसतो. अशा परिस्थितीतील कौटुंबिक जीवनामधले हिणकस व बेगडी वर्तन सामाजिक जीवनातही गणेश मंडळांतील उत्सव साजरा करताना वारंवार दिसते. अशा सवंग, संधीसाधू वर्तनातून आपणा सर्वाचीच प्रयोगशीलता व आत्मपरीक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या नम्रतेचा संकोच होत आहे.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती

गणेशाच्या मूर्तीसंबंधी चार प्रश्न विचारणे शक्य आहेत : (१) मूर्ती कशापासून बनवाव्या? (२) मूर्तीची सजावट कशी असावी? (३) भोवतालची आरास व पूजा साहित्य काय असावे? व (४) मूर्तीचा आकार केवढा असावा? आय.आय.टी.त प्रयोगशाळेत शिस्तशीर प्रयोग केले. काचेच्या अ‍ॅक्वेरियम टाक्या वापरल्या. कागदाचा लगदा, शाडू माती व प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) यापासून बनविलेल्या साधारण ८-१० इंच उंच गणेशमूर्ती अभ्यासासाठी निवडल्या. पवई तलावातील गाळ (चिकणमाती) वापरूनही कुणी एक सजावट न केलेली मूर्ती आणून दिली. तिच्यावरही प्रयोग केले. वर उल्लेख केलेल्या मूर्ती ६० ते ८० लिटर पाण्यात काचेच्या टाकीत ठेवून त्यांच्यावरचा रंगांचा थर व नंतर पुढे सबंध मूर्तीच कशी विरघळते याचे निरीक्षण केले. रंग पाण्यात उतरल्यावर पाण्याच्या नमुन्यांचे परीक्षण केले. शिवाय निरनिराळ्या चित्रशाळांतून कागदाच्या लगद्यापासून, शाडू मातीपासून व पी.ओ.पी.च्या मूर्ती बनविताना जे रंग वापरतात त्यांचे नमुने मिळविले व त्यांच्या घटकांचाही अभ्यास केला.

सगळा ऊहापोह करून काही ठळक निष्कर्ष मांडणे शक्य झाले. पहिली थोडी आश्चर्यजनक गोष्ट होती पीओपीच्या मूर्तीविषयी. तीन महिने उलटले तरी मूर्ती पाण्यात सुमारे जशीच्या तशी होती! नाही म्हणायला रंगांचे थर निखळून बारीक गाळ काचेच्या टाकीत तळावर जमा झाला होता. ती मूर्ती पाण्यात राहून ठिसूळ मात्र बनली होती. प्रयोगशाळेतील केलेली निरीक्षणे व नैसर्गिक तलावात, खाडीत वा नदीत जे बदल आढळतील त्यात नक्कीच तफावत असणार.

प्रत्यक्षात हवेमुळे येणाऱ्या लाटा, भरती-ओहोटी, जलचरांची हालचाल व पाण्यातील अंत:स्थ प्रवाह या सर्वाचा निश्चितच परिणाम होऊन विघटनाचा वेग वाढेल. ज्या काचेच्या टाकीमध्ये शाडू मातीची मूर्ती ठेवली होती त्या टाकीत ४५ मिनिटांत मूर्ती विरघळून मातीचा ढिगारा तयार झाला. थोडय़ाफार फरकाने सुमारे तशाच पद्धतीने पवई तलावातील गाळापासून बनविलेली मूर्तीसुद्धा थोडय़ाच तासांत विरघळलेली आढळली. शाडू माती व चिकणमातीपासून बनविलेल्या मूर्ती प्रयोगशाळेतील निश्चल पाण्यात टाकीत एक-दोन तासांत ढेपाळून विरघळलेल्या पाहून ठाण्यातील तलावातील निरीक्षणे आठवली.

माझे गुरू प्रा. नागेश टेकाळे व माझा अभ्यासगट वर्षांनुवर्षे ठाण्यातील तलावपाळीत अनंत चतुर्दशीनंतर मासे मेल्यावर त्यांच्या मरणाची कारणे शोधत असू. टेकाळे सरांनी मृत माशांच्या कल्ल्यांमध्ये मातीचे कण, गाळ व इतर कणरूपी प्रदूषण कसे थर साठवून कल्ले श्वसनासाठी निरुपयोगी करते, हे दाखविले होते. हे तर खरेच की, असा गाळ व सूक्ष्म मृत्तिका कण कुठल्याही नैसर्गिक स्थितीत पाण्यात असतीलच, पण हजारो मूर्ती व लाखो किलो मातीसदृश्य कचरा जर आपण आठवडाभरात नदी, खाडी व तलावांत इतस्तत: फेकला तर त्याचे गंभीर परिणाम का होणार नाहीत?

कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या गणेशमूर्तीवर प्रयोग करताना आढळले की, लगदा फारच चटकन पाणी शोषून घेतो व टाकीत तासाभरात ढिगारा तयार होतो. यथावकाश मूर्तीचे रंगकामही विरघळते. दोन-चार दिवसांत पाण्याच्या टाकीतून नासका वासही येतो. लगदा बुळबुळीत बनतो व सांडपाण्यासारखी फिकट धूसर छटा टाकीतील पाण्यात पसरते. या वर वर्णन केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांतील निष्कर्ष पाहून मनात विचार आला की, पर्यावरणस्नेही मूर्ती कशाची बनवावी, हे ठरविण्यापूर्वी निसर्गचक्र समजावून घ्यावे.

नैसर्गिक परिसंस्थेवर संकट

कुठलाही तलाव, नदी अथवा समुद्रकिनारा ही एक गुंतागुंतीची व परस्परांवर अवलंबून असलेल्या जीवजंतूंची, वनस्पतींची, प्राणी-कीटकांची व निरनिराळ्या रसायनांचे पाण्यासोबतच्या शत्रुत्वाची व मैत्रीची व मानवाला अद्यापि संपूर्णपणे न उमगलेली अशी कोमल व संतुलित अशी परिसंस्था असते. अनेक छोटय़ा-छोटय़ा परिसंस्थांचे ताणे-बाणे विणून ‘निसर्ग’ नावाची एक महान व अगम्य गुंफण तयार झाली आहे. माझ्यासारख्या लाखो शास्त्रज्ञांना आतापर्यंत निसर्गाचे ज्ञान ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेसारखे तुकडय़ा-तुकडय़ाने, अपूर्ण व खंडित स्वरूपात हाती लागले आहे. त्याचे चित्रण सोबतच्या आकृतीमध्ये दिले आहे. तुमच्या लक्षात येईल की, अनेक छोटी चक्रे स्वतंत्रपणे व काही मोठी व काही छोटी मिळून एका अजस्र चक्रात भाग घेऊन हा निसर्ग कालक्रमण करीत आहे.

अचानक लहर लागली म्हणून परिसंस्थेत घातक धातूंचे प्रदूषण अथवा अतोनात प्रमाणात साधी मातीसुद्धा लोटणे ही परिसंस्था सहन करू शकत नाही. निरनिराळे जीव परस्परांवर अवलंबून असतात व एखाद्या रसायनाचा अतिरेक किंवा अभाव अथवा एखाद्या जीवाचा मृत्यू हा साखळी तोडणारा व परिसंस्थेच्या मुळावर उठणारा ठरू शकतो.. किंबहुना ठरतोच. मृत्तिका कण, गाळ, मूर्तीवरील पेन्ट, रोगण यांची मात्रा पाण्यात उतरणे किंवा कुजणारा कागदाचा लगदा यामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा अभाव किंवा तुटवडा निर्माण होतो.

मूर्तीमुळे प्रदूषण निश्चित होते हे आपण पाहिले. त्यात भर पडते पूजेचे निर्माल्य, सजावट, आभूषणे व आरास करायला वापरले जाणारे प्लायवूड, कापड,  थर्मोकोल व बॅनर. या वस्तू अविनाशी, जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या, वनस्पतींची तोड करून वैश्विक उष्णतावाढीला हातभार लावणाऱ्या व पेन्ट, पिग्मेन्ट, वार्निशे तसेच रसायने वापरून बेछूट पर्यावरणहानी व संकट निर्माण करणाऱ्या वस्तूंची. जलस्रोत, जमीन, भूगर्भ, हवा व एकंदरच जैवविविधतेशी मित्रत्वाने वागू शकणारी, निसर्गासाठी पोषक (किमान निसर्गचक्राची हानी न करणारी) व नैसर्गिक परिसंस्थेवर दूरगामी परिणाम करण्याची सुतराम शक्यता नाही, असे ठामपणे सांगता येईल, अशी कोणतीही मूर्ती बनविण्याची द्रव्ये व सजावट तसेच आरास बनविण्याचे साहित्य मला सांगता येणार नाही.

आवाहन

एकविसावे शतक हे ज्ञानाचे व प्रतिभेचे शतक असणार आहे, असे ऐकतो. खरे आहे का? मग कुठे गेली सगळी प्रतिभा आणि ज्ञान? गणेशोत्सवासंदर्भातले निरनिराळ्या पर्यावरणस्नेही प्रयोगांविषयी मी बारकाईने वाचतो आहे, ऐकतो आहे व माझी निरीक्षणे नोंदवितो आहे. अशा अशा पद्धतीने आम्ही गणेशमूर्तीचे विसर्जन केले व पाणीप्रदूषण टाळले म्हणणाऱ्या व्यक्तींचेच प्रयोग माझ्या शास्त्रीय चौकटीत बसतात. बाकी नाही. तुमचे स्वत:चे किंवा तुम्ही नोंदविलेली निरीक्षणे माझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत. ई-मेलने कळवा.

– प्रा. श्याम आसोलेकर

asolekar@gmail.com

लेखक आयआयटी-मुंबई येथील पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रात प्राध्यापक आहेत.