घर नीटनेटकं, स्वच्छ आणि सुव्यवस्थित असावं, ते सुंदर सुंदर वस्तूंनी सुशोभित करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण बाजारातून पडदे, वॉल हँगिग्ज, फ्लॉवर पॉटस-फुलं, लँप शेडस असं बरंच काही विकत आणत असतो. त्यातल्या कितीतरी वस्तू या घरी बनवता येणे शक्य असते. त्यासाठी लागणारे साहित्य हल्ली बाजारात सहज उपलब्ध असते. काही वस्तू तर घरातील टाकाऊ वस्तूंपासून देखील बनवता येऊ शकतात. अशावेळी हौशी आणि थोडेफार कौशल्य असणा-या सर्वानाच मार्गदर्शन करणारे काही मिळाले तर सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते.

<https://www.pinterest.com/>  या साईटवर लॉगिन केल्यास तुम्हाला अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळते. गुगल, फेसबुक किंवा ट्विटरचे लॉगिन वापरून तुम्ही येथील विविध प्रकारची माहिती मिळवू शकता. तुम्हाला ज्या गोष्टीचे मार्गदर्शन हवे त्याबद्दल सर्च केल्यास हजारोंच्या संख्येने रिझल्ट उपलब्ध होतात. समजा तुम्ही सर्चबारमधे रिसायकल्ड असा शब्द टाईप केला तर सर्च रिझल्टमधे प्लॅस्टिकच्या बाटल्या, कप, चमचे, खराब झालेल्या सीडीज, वर्मानपत्र, विविध आकाराची झाकणे, पुठ्ठा, जुने कपडे अशा असंख्य टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या अतिशय आकर्षक वस्तूंचा मोठा खजिनाच येथे उपलब्ध होतो. एखाद्या आवडलेल्या कलाकृतीवर तुम्ही क्लिक केलेत तर ती कशी तयार करायची याच्या स्टेप्स फोटोच्या माध्यमातून दिसतील. त्यामुळे आपल्याला नवी कल्पना मिळायला मदत होते. तुम्हीही एखादी नवी कलाकृती तयार करू शकता.

विविध समारंभाना जाताना आपण आप्तेष्टांना भेटवस्तू देतो. त्याचे पॅकिंग दुकानदारांकडून करून घेतो. हे पॅकिंग उत्तम आणि आकर्षक पध्दतीने कसे करायचे याचे मार्गदर्शन देखील या साईटवर केलेले आहे. या साईटवरची एखादी कल्पना तुम्हाला आवडली तर ती इतरांना देखील पाठवू शकता. तसेच फेसबुकवर शेअर देखील करू शकता.

पिटरेस्टचा हा मंच केवळ नवनवीन कल्पना घेण्यासाठीच नाही तर देण्यासाठी देखील आहे. तुमच्याजवळ असलेले अशाप्रकारचे कौशल्य या साईटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोप-यातील लोकांपर्यत सहज पोचवू शकता. तुमची कल्पकता वापरून तयार केलेल्या गोष्टी किती अपलोड कराव्यात या संख्येवर कसलेही बंधन नाही. हे सर्व विनामूल्य आहे.

सध्या शाळांमधून मुलांना टाकाऊतून टिकाऊ ही थीम वापरून प्रोजेक्टस करायला सांगितली जातात. अशावेळी ही साईट नक्कीच मार्गदर्शक ठरू शकते. सध्या विघटन न होणा-या कच-याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या, सीडीज वगरचा कुशलतेने वापर करून हा प्रश्न सोडवण्यासाठी थोडाफार का होईना हातभार लावू शकता. काय मग हा खारीचा वाटा उचलाल ना ?

मनाली रानडे
manaliranade84@gmail.com