देशात सर्वाधिक वापर असलेली ई-मेल सेवा म्हणजे जीमेल. या सेवेचा आपण सतत वापर करत असतोच; पण त्यातील सर्व टूल्सचा वापर फारच कमी जण करताना दिसतात. जीमेलमध्ये असे काही टूल्स आहेत ज्याचा वापर करून आपण आपलीई-मेल सेवा अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. जीमेलमधील कमीत कमी वापरल्या जाणाऱ्या टूल्सची माहिती घेऊ या.
ई-मेलचे वेळापत्रक
हे वाचून आश्चर्य वाटले असेल. मात्र आपण ई-मेल्स पाठविण्याचे किंवा वाचण्याचे वेळापत्रक ठरवू शकतो. मायक्रोसॉफ्ट आऊटलुकमध्ये आपण अशा प्रकारे वेळापत्रक तयार करू शकतो. तसेच जीमेललाही करता येते. आपल्याला एका विशिष्ट वेळेत एखाद्याला ई-मेल पाठवायचा असेल आणि त्या वेळेस आपण संगणकासमोर बसून किंवा मोबाइलमध्ये जीमेल वापरू शकणार नसू, तर अशा वेळी या सुविधेचा आपण वापर करू शकतो. जीमेलमध्ये अंतर्गत ही सेवा उपलब्ध नाही. मात्र तुम्ही जे ब्राऊझर वापरतात त्या ब्राऊझरच्या एक्स्टेंशनमध्ये बूमर्ग, राइट इनबॉक्स किंवा साइडकिक नावाचे एक्स्टेंशन असतात. हे तुम्ही तुमच्या संगणकात इन्स्टॉल केले की, ते जीमेलमध्ये दिसू लागतात. यात दर महिन्याला दहा ई-मेल्स मोफत पाठवण्याची सुविधा असते. यापेक्षा जास्त ई-मेल्स पाठवायचे असतील, तर तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या पक्षाला तुमच्या जीमेलचे अधिकार द्यावे लागतात. यानंतरच तुम्ही ही सेवा वापरू शकता. एकदा का तुम्ही ही सेवा सुरू केली की, तुम्हाला ई-मेल पाठवायच्या वेळेतील शेडय़ूलचा पर्यायही दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर कधी पाठवायचा याची वेळ आणि तारीख तुम्ही त्यात सेट करून ठेवू शकता. याशिवाय तुम्ही गुगलमधील स्प्रेडशीटचा वापर करूनही ई-मेलचे वेळापत्रक ठरवू शकता. यामध्ये तुम्ही ई-मेल टाइप करून सेव्ह केला की, स्प्रेडशीटमध्ये ई-मेल आयडी, ई-मेलचा विषय, तारीख आणि वेळी तुम्ही सेट करून ठेवू शकता. यामध्येही मोफत आणि प्रीमियम सेवा उपलब्ध आहे.
स्नूझ ई-मेल्स
ई-मेल पाठविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण वेळापत्रक ठरवतो त्याप्रमाणे ई-मेल वाचण्यासाठीही ठरवू शकतो. दिवसात शेकडो मेल्स येत असतात. त्यातील एखादा ई-मेल नंतर वाचायचा असेल तर तुम्ही त्यासाठीही तारीख आणि वेळ निश्चित केली की, त्या दिवशी तो ई-मेल तुमच्या इनबॉक्समध्ये वर येतो आणि तुम्ही तो ई-मेल वाचू शकता. गुगलच्या क्रोम बाऊझरमध्ये जीमेल स्नूझ नावाचे एक्स्टेंशन देण्यात आले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही या सुविधेचा फायदा घेऊ शकता.
सेंड स्टॉक रिस्पॉन्स
आपण कामात असताना एखादा फोन आला. तो फोन आपल्याला उचलता येणे शक्य नसेल, तर आपण त्यांना मोबाइलमध्ये सेव्ह असलेला संदेश पाठतो. तसाच संदेश आपण ई-मेलद्वारेही पाठवू शकतो. म्हणजे तुम्ही काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल किंवा तुम्हाला ई-मेलचा अ‍ॅक्सेस मिळणार नसेल किंवा तुम्हाला खूप साऱ्या ई-मेल्सना एकच उत्तर पाठवायचे असेल, तर जीमेल लॅबमधील स्टॉक रिप्लाय हा पर्याय निवडून त्यात एक संदेश तुम्ही साठवून ठेवू शकता. मग तो ई-मेल सर्वाना पाठविणे सोपे जाते.
ई-मेल ट्रॅकर
तुम्ही दोन वेळा, तीन वेळा ई-मेल पाठवूनही तो वाचला नाही असे उत्तर सांगून काम टाळणारे अनेक जण आपल्याला भेटतात. अशांवर आपण ई-नजर ठेवू शकतो. आपला ई-मेल वाचला आहे की नाही, तो किती वेळा वाचला याचा सर्व तपशील आपल्याला समजू शकतो. यासाठी गुगल क्रोमने ई-मेल ट्रॅकरचे एक्स्टेंशन दिले आहे. यामध्ये आपण एखादा मेल सतत ट्रॅक करू शकत नाही. आपला मेल वाचला गेला की तो कधी आणि किती वेळा वाचला गेला हे सांगणारा ई-मेल आपल्याला येतो. याशिवाय यामध्ये डेस्कटॉप नोटिफिकेशनचा पर्यायही देण्यात आला आहे, जेणेकरून तुम्हाला डेस्कटॉपवरच ई-मेल आल्याचे समजू शकेल. यातही काही मर्यादित ई-मेल्स आपण ट्रॅकिंग करू शकतो. अधिक ई-मेल्ससाठी प्रीमियम सेवा घ्यावी लागेल.
टू डू लिस्ट
गुगल क्रोम आणि फायफॉक्स या दोन ब्राऊझर्समध्ये हे एक्स्टेंशन उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही तुमची दिवसभराची कामे नोंदवून ठेवू शकता. तुमच्या ई-मेल स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला हे टास्क दिसत राहतील. इतकेच नाही तर त्याची आठवणही जीमेल तुम्हाला करून देईल. याचबरोबर तुम्हाला एखादे काम एखाद्या व्यक्तीला सांगायचे असेल तर तसा ई-मेलही थेट पाठवण्याची सुविधा यामध्ये आहे. तसेच या कामावर लक्षही या सेवेच्या माध्यमातून ठेवता येऊ शकते. या सुविधेची मोबाइल आवृत्तीही उपलब्ध आहे. यामुळे आपण कुठेही कधीही या सुविधेचा फायदा घेऊ शकतो.
जीमेल ऑफलाइन
तुम्हाला इंटरनेट जोडणी नसेल, तर तुम्ही ऑफलाइन जीमेल सेवाही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला ई-मेल्स वाचणे आणि त्यांना रिप्लाय करणे शक्य होणार आहे. यासाठी गुगलने जीमेल ऑफलाइन नावाचे अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपमध्ये तुमचे जीमेलचे सर्व ई-मेल्स दिसतात. मात्र आपण जोपर्यंत इंटरनेट जोडणी सुरू करत नाही तोपर्यंत नवीन मेल्स त्यामध्ये दाखल होत नाही; पण मेल्स वाचणे आणि त्याला रिप्लाय करणे हे शक्य होते.

नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com