* मायक्रोसॉफ्ट एक्सेलला कोणते पर्याय आहेत. यापैकी ऑफिसच्या कामांसाठी कोणता पर्याय योग्य आहे.   – योगेश बंदे

* मायक्रोसॉफ्ट ऑफिसला समकक्ष असे अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये फ्री ऑफिस, अपाचे ऑफिस, लिब्रा ऑफिस, गुगल डॉक्स, अटलांटिस नोवा, डब्लूपीएस ऑफिस असे पर्याय आहेत. या सर्व पर्यायांमध्ये एमएस एक्सेलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय या सुविधा संपूर्ण मायक्रोसॉफ्ट ऑफिसलाच पर्याय ठरू शकतील अशा आहेत. यापैकी अपाचे ऑफिस आणि लिब्रा ऑफिस हे पर्याय मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या जास्त जवळ जाणारे आहेत. यामुळे काम करताना तुम्हाला फारसे अडथळे जाणवणार नाहीत.

* मोबाइलमध्ये साठवलेल्या विविध फाइल्सचे व्यवस्थापन करणे अनेकदा अवघड जाते. हे व्यवस्थापन करण्यासाठी एखादे अ‍ॅप सूचवा.       – राजेश नाडकर्णी

*  आपल्या मोबाइलमध्ये मोठय़ा प्रमाणावर माहिती असते. या माहितीचे व्यवस्थापन करणे म्हणजे आपल्यासाठी अनेकदा डोकेदुखी ठरते. तरीही मोबाइलमध्ये आपण फोल्डर करून त्यामध्ये माहिती वेगवेगळय़ा प्रकारे साठवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण जर विविध माहितीसाठी वेगवेगळय़ा रंगाचे लोगो मिळाले आणि त्यानुसार आपण माहिती साठवली तर ती माहिती शोधणेही सोपे जाते. यासाठी अँड्रॉइडवर सध्या उपलब्ध असलेले सुपर फाइल मॅनेजर हे अ‍ॅप खूप लोकप्रिय होत आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला व्हिडीओ, गाणी, छायाचित्रे आदी वेगवेगळय़ा विभागांसाठी वेगवेगळय़ा गोष्टी देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे अ‍ॅप आपली मोबाइल डिरेक्टरीही खूप चांगल्या प्रकारे हाताळते. यामुळेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती व्यवस्थापन करता येणे शक्य होते. तसेच यामध्ये कुरिअरची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे आपण एखादी फाइल नेटवर्क नसतानाही हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. या अ‍ॅपमध्ये माहिती कॉम्प्रेस करून साठवली जाते, यामुळे फोनमध्ये अधिक जागा उपलब्ध होणेही शक्य होते.

तंत्रस्वामी