कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात आधार कार्ड नोंदणी केंद्रे काही संस्था तसेच होतकरू नागरिकांनी सुरू केली आहेत. या केंद्रांवर आधार कार्ड काढताना पैशांची मागणी करण्यात येत आहे, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रांचा प्रचाराचा भाग म्हणून कसा उपयोग करता येईल यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे.
आधार कार्डचा उपयोग विविध सरकारी कामांसाठी होणार असल्याने नागरिकांनी विविध आधार कार्ड नोंदणी केंद्रांमध्ये गर्दी केल्याचे चित्र आहे. मात्र या केंद्रांवर नागरिकांकडून सर्रास १०० ते २०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. डोंबिवलीत सावरकर रस्त्यावरील रामचंद्र सिनेमागृहाजवळ सुरू असलेल्या केंद्रात हा प्रकार सुरू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. व्यक्ती बघून कार्ड काढताना पैसे कमी-जास्त आकारले जातात, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
तोंडावर आलेल्या पालिका  निवडणूक लढविणाऱ्या होतकरू उमेदवारांनी आधार कार्ड काढणाऱ्या संस्थांना हाताशी धरून आपल्या प्रभागात नोंदणी केंद्र सुरू केले आहेत. हे कार्ड आपल्या प्रयत्नाने देत आहोत, असे भासविण्याचा प्रयत्नही सध्या जोरात सुरू आहे. विकासकामांच्या बाबतीत कर्तृत्वशून्य असल्याने उमेदवारांनी आधार कार्डच्या माध्यमातून मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. महापालिका अधिकाऱ्याने आधार कार्ड केंद्रे ही महापालिकेच्या अखत्यारित नसल्याचे सांगितले. यापूर्वी ही यंत्रणा पालिकेच्या नियंत्रणाखाली होती. आता ती नसल्याचे सांगितले.

कल्याण-डोंबिवलीत तीन ते चार ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्रे आहेत. काही स्वयंसेवी संस्था ही कामे करीत आहेत. या संस्थांची नावे तहसीलदार कार्यालयाकडे आहेत. पण या केंद्रांमधून आधार कार्ड काढताना पैसे घेण्यात येत असतील तर ते गैर आहे. अशा केंद्रांची तातडीने चौकशी करण्यात येईल आणि तेथील पैसे घेण्याचा प्रकार थांबवण्यात येईल. केंद्र चालकाने पुन्हा पैसे घेण्याचा प्रकार केला, तर ते केंद्र बंद करण्यासाठी वरिष्ठांना कळवण्यात येईल.
-किरण सुरवसे, तहसीलदार,