वसई किल्ल्यात स्मृतींना उजाळा

वसईचे योद्धे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या २७५ व्या स्मृतीदिनानिमित्त वसई किल्ल्यात असलेल्या चिमाजी अप्पांच्या स्मारकावर त्यांच्या स्मृतींना विविध कार्यक्रमांनी उजाळा देण्यात आला. किल्ले वसई मोहिमेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

स्मृतीदिनाच्या या कार्यक्रमासाठी स्मारक आणि किल्ला परिसरात स्वच्छता करण्यात आली होती. १२ डिसेंबर रोजी किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींनी पुण्यात्ील शनिवार वाडा येथील हजारी कारंजे या चिमाजी अप्पांच्या समाधीवर जाऊन कलशपूजन केले होते. तो  कलश वसईतील चिमाजी अप्पांच्या स्मारकात आणला. श्री शिवसंकल्प प्रतिष्ठानने स्मारकास तोरण, भगवे झेंडे लावून आणि रांगोळ्या काढल्या होत्या. पुण्यात चिमाजी अप्पांच्या समाधीवर पूजण्यात आलेल्या कलशात वसईतील सात तीर्थक्षेत्राचे पाणी मिसळण्यात आले. या कलशातल्या पवित्र पाण्याने स्मारकावर जलाभिषेक करण्यात आला. मुख्य पुतळ्याचे पूजन करून निशाण रोवण्यात आले. चिमाजी अप्पांच्या पाठोपाठ सती गेलेल्या त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांच्या स्मरणार्थ दिपपूजन करण्यात आले. वसई मोहिमेच्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ मानवंदना देण्यात आली. यावेळी ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वसई आणि मुंबई परिसरातून अनेक दुर्गसंवर्धक मित्र हजर होते. वसई किल्ले मोहिमेचे डॉ श्रीदत्त राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते