चिखलोलीपाठोपाठ जावसई धरणातूनही पाणीपुरवठा
सध्या ठाणे जिल्ह्य़ात भीषण पाणीटंचाई भेडसावत असूनही अंबरनाथच्या वेशीवरील जावसई गावातील एक धरण चक्क वापराविना पडून असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच सर्व संबंधित यंत्रणांना जाग येत अखेर येथून अंबरनाथवासीयांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय संबंधित यंत्रणांनी घेतला आहे.
केंद्र शासनाच्या आयुध निर्माणी कारखान्यालगत असलेल्या जावसई गावाच्या हद्दीत असलेला हा जलसाठा प्रत्यक्षात पाझर तलाव आहे. १९८० मध्ये जिल्हा परिषदेने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून हा तलाव बांधला. मात्र गेल्या तीन दशकांत वाढत्या नागरीकरणाने या भागातील शेती व्यवसाय संपुष्टात आला. मध्यंतरीच्या काळात जीवन प्राधिकरणामार्फत या पाझर तलावातून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सर्वेक्षणही झाले होते. मात्र येथून बारमाही पाणी उपलब्ध होऊ शकणार नसल्याचा अभिप्राय त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने ही योजना बारगळली होती. विशेष म्हणजे धरणालगतच असलेल्या जावसई गावात तसेच त्यापुढील कमलानगर, फुलेनगर, कोहोजगांव या अंबरनाथमधील परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे.
या पाझर तलावाद्वारे या सर्व भागात किमान सहा-आठ महिने मुबलक पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे. पाझर तलाव उंचावर असल्याने गुरुत्त्वीय पद्धतीने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आता या पाझर तलावाचे धरणात रूपांतर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या जावसई गावातील महिला कपडे धुण्यासाठी या पाझर तलावाचा वापर करतात.

तातडीने गाळ काढणार
जावसई गावातील पाझर तलावाची पाहणी केली. आता मे महिन्यातही येथे पाणी आहे. सध्या येथे मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. येत्या आठ दिवसांत लोकसहभागातून गाळ काढण्यात येणार आहे. पाधबंधारे विभाग, नगरपालिका यांच्या सहकार्याने हे काम केले जाईल. काही बांधकाम व्यावसायिकांनी गाळ काढण्यासाठी यंत्रणा पुरविण्याचे मान्य केले आहे. ‘एससीजीके’ कंपनीने तसे पत्रही दिले आहे. गाळ अतिशय सुपीक असतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तो गाळ उपसून घेऊन जावा, असे आवाहन आम्ही केले आहे.
प्रशांत जोशी, तहसीलदार

अंबरनाथकरांना दिलासा
दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या जावसई पाझर तलावाचे धरणात रूपांतर केल्यास भविष्यात अंबरनाथकरांना मोठा दिलासा मिळू शकेल. तूर्त तातडीने पावसाळ्याआधी या तलावात साचलेला गाळ काढणे आवश्यक असून तहसील कार्यालयाने हाती घेतलेल्या या मोहिमेस पालिका प्रशासन सवरेतपरी सहकार्य करेल.
-गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ पालिका