कॉकर स्पॅनिअल

स्वभावातील प्रामाणिक वृत्तीसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय पाळीव प्राणी म्हणजे अर्थात कुत्रा. प्राचीन काळापासून कुत्रा हा प्राणी पाळला जातो. राखणदार, प्रामाणिक स्वभावामुळे आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे कुत्र्याची वैशिष्टय़े म्हणता येतील. काळ बदलला त्यानुसार पाश्चिमात्यीकरण आपल्या देशात व्हायला लागले. प्राण्यांच्या बाबतीतही अनेक पाश्चिमात्य प्राण्यांच्या जाती भारतात उपलब्ध होऊ लागल्या. भारतीय लोकांची अशा पाश्चिमात्य प्राण्यांच्या प्रजातीसाठी मागणी वाढू लागली. कॉकर स्पॅनिअल ही अशीच एक कुत्र्याची प्रजाती.

शारीरिक वेगळेपण आणि घ्यावयाची काळजी

कॉकर स्पॅनिअल या कुत्र्याचे साधारण आयुष्य १२ ते १५ वर्षांपर्यंत असते. शारीरिकदृष्टय़ा वेगळेपण म्हटले तर या कुत्र्याचे कान खूप मोठे आणि लांब असतात. कान मोठे असल्याने या कुत्र्यांच्या कानांची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण कानांच्या जवळचा भाग लांब कानांमुळे झाकला जात असल्याने त्या ठिकाणी जखम झाल्यास ती निदर्शनास येत नाही. या प्रकारच्या कुत्र्यांना कानांबरोबरच तोंडाचे आजार होण्याची शक्यता असते. यासाठी या कुत्र्यांच्या कानांची आणि तोंडाची रीतसर तपासणी पशुवैद्यांकडून करून घेणे गरजेचे असते. कॉकर स्पॅनिअल कुत्र्यांच्या संपूर्ण शरीरावर लांब व सुळसुळीत केसांचे आवरण असते. त्यामुळे सतत त्यांचे शरीर साफ करणे, शरीरावरील केस स्वच्छ करणे या सर्व गोष्टींची काळजी या कुत्र्यांच्या मालकांना घ्यावी लागते, अशी माहिती ठाण्यातील पशुवैद्य डॉ. जेनेट इंचिपरमबन यांनी दिली.

खेळणे माझी आवड

सामान्य कुत्र्यांपेक्षा कॉकर स्पॅनिअल या कुत्र्यांना खेळणे जास्त आवडते. सतत आपल्या मालकासोबत किंवा घरातील सदस्यांसोबत खेळायला ते जास्त उत्सुक असतात. एखादी वस्तू त्यांच्यासमोर फेकली की ती वस्तू त्वरित तुमच्याकडे परत आणून देण्यास हे कुत्रे तत्पर असतात. खासकरून त्यांच्या याच वैशिष्टय़ांसाठी कुत्र्यांचा हा प्रकार ओळखला जातो. कुत्र्यांच्या या प्रजातीला चालायला आणि धावायला खूप आवडते.

राखणदारी बिलकुल नाही!

सामान्यत: राखणदारीसाठी किंवा संरक्षणासाठी कुत्रा पाळला जातो. मात्र कॉकर स्पॅनिअल हे कुत्रे संरक्षण आणि राखणदारीसाठी अजिबात उपयोगाचे नाहीत. संरक्षणासाठी एखाद्या व्यक्तीस कुत्रा पाळायचा असेल तर कॉकर स्पॅनिअल कधीच पर्याय ठरू शकत नाही. याचे कारण असे की, हे कुत्रे शांत स्वभावाचे आणि मैत्रिभाव असणारे असतात. कोणाही अनोळखी माणसावर ते पटकन झडप घालू शकत नाहीत. केवळ कुत्रा पाळण्याची हौस किंवा मनोरंजन या उद्देशाने कॉकर स्पॅनिअल पाळता येते.

वैशिष्टय़े
* सामान्य कुत्र्यांपेक्षा आपल्या दिसण्याने आणि स्वभावातील वेगळ्या वैशिष्टय़ांमुळे कॉकर स्पॅनिअल ही प्रजाती वेगळी ठरते.
* कॉकर स्पॅनिअल दिसायला आकर्षक असतात.
* मूळचा स्पेन देशातील असलेला हा कुत्रा चपळ, शांत स्वभाव आणि खेळकर वृत्तीसाठी ओळखला जातो.
* लाल, काळा आणि सोनेरी रंगांमध्ये कॉकर स्पॅनिअल आढळतात.
* कॉकर स्पॅनिअल या कुत्र्याच्या प्रकारात साधारणपणे अमेरिकन कॉकर स्पॅनिअल, इंग्लिश कॉकर स्पॅनिअल असे प्रकार येतात.
* कॉकर स्पॅनिअल हे ब्रीड बाजारात साधारण बारा ते पंधरा हजार किमतीपर्यंत उपलब्ध होतात.

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

जिव्हाळय़ाचे संबंध
मुळात कॉकर स्पॅनिअल हे ब्रीड माणसांशी मैत्रीपूर्ण भाव जास्त जपतात. त्यामुळे आपलेसुद्धा त्यांच्याशी भावनिक नाते जोडले जाते. ठाण्यातील सौरभ जाधव यांच्या घरी असलेल्या कॉकर स्पॅनिअल ब्रीडला त्यांच्या घरातील सदस्य सॅम नावाने संबोधतात. सॅमला शाकाहारी अन्नापेक्षा जास्त मांसाहारी अन्नाची आवड असल्याची माहिती सौरभ जाधव यांनी दिली. १४ जानेवारी २०१३ रोजी सौरभ जाधव यांनी सॅमला आपल्या घरी आणले तेव्हापासून गेली दोन वर्षे सॅमशी घरातल्या प्रत्येक सदस्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे. घरातील कोणीही व्यक्ती आजारी असल्याची जाणिव सॅमला झाली की तो रात्रभर त्या व्यक्तीच्या उशाशी बसून राहतो आणि त्याच्या दृष्टीने घरच्या सदस्याची काळजी घेतो. सॅमला त्यांनी बसणे, उभे राहणे आणि सलाम करणे या कमांड शिकवल्या आहेत, त्यानुसार सूचना केल्यास सॅम त्या सूचना पाळतो, असे सौरभ जाधव यांनी सांगितले.

आमच्या घरी कॉकर स्पॅनिअल आहे. संरक्षणासाठी या कुत्र्याच्या प्रजाती उपयोगी नसल्या तरी प्रेमळ स्वभाव, घरातल्या सदस्यांविषयी असलेली आपुलकी आणि त्याची खेळकर वृत्ती यामुळे या कुत्र्याशी माझे एक जिव्हाळय़ाचे नाते तयार झाले आहे.
– सौरभ जाधव, ठाणे.