मेघदूत, ठाणे (पूर्व)
tvlogनागरीकरणाच्या रेटय़ात आधुनिक ठाणे शहरात नवनवीन टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरात आता अपवादानेच तीन-चार मजल्यांच्या इमारती दिसून येतात. मात्र शहराच्या पूर्व विभागात दोन मजल्यांच्या इमारती असलेली ४५ वर्षे जुनी ‘मेघदूत’ वसाहत उभी आहे. यावर ठाण्यात नव्याने स्थायिक झालेल्या ठाणेकरांचा विश्वासच बसणार नाही. ‘जुनं ते सोनं’ं ही म्हण मेघदूत वसाहतीस चपखल लागू होते. मेघदूत वसाहतीत प्रवेश केल्यानंतर हे जुनं सोनं अजूनही किती लखलखीत आहे याची प्रचीती मेघदूतच्या बांधकामाकडे पाहून येते.
ठाणे शहर म्हटले की प्राधान्याने पश्चिमकडचा विभाग आठवतो. पूर्वेकडे फारसे लक्ष जात नाही. मात्र एकाच शहराचा हा दुसरा भाग खूपच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. पूर्वेकडे आल्यावर आपण एखाद्या दुसऱ्या शहरात आलोय की काय असे वाटू लागते. सोयीसुविधांबाबतही पूर्वेकडच्या विभागाकडे अन्याय केला जातो, अशी येथील रहिवाशांची जुनी तक्रार आहे. एक मात्र खरे की पश्चिमेच्या तुलनेत काहीसा शांत आणि निसर्गरम्य असा हा पूर्व विभाग आहे. विकासाच्या बाबतीतही हा भाग पश्चिमेपेक्षा मागेच राहिला. मात्र वाढत्या नागरीकरणाच्या रेटय़ात विकासकांनी हळूहळू पूर्वेकडे आपला मोर्चा वळविला. त्यामुळे पूर्वेतही आता पश्चिमेप्रमाणेच टॉवर संस्कृतीने मूळ धरले असले तरी आजूबाजूला नव्याने उभ्या राहणाऱ्या वसाहतींमध्ये मेघदूत वसाहतीने गेली ४५ वर्षे आपली वेगळी, वैशिष्टय़पूर्ण ओळख जपली आहे. ठाणे पूर्वेकडे रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर नवख्या व्यक्तीने कुणालाही ‘मेघदूत वसाहत कुठे’ हा प्रश्न विचारला तरी लोक क्षणार्धात पत्ता सांगतात. कारण ठाणे पूर्व विभागातील सर्वात जुन्या वसाहतींपैकी ती एक आहे. ठाणे पूर्वेच्या लोकमान्य टिळक नगर येथील नाखवा हायस्कूलजवळ मेघदूत उभी आहे.
रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांची वस्ती
१९७० मध्ये ठाणे रेल्वे स्थानकापासून सात ते आठ मिनिटांच्या अंतरावरील मोकळ्या भूखंडावर मेघदूत वसाहतीच्या पहिल्या इमारतीचा पाया रचला गेला. त्यानंतर एक-एक वर्षांच्या अंतराने अजून दोन इमारती १९७१, १९७२ मध्ये उभ्या राहिल्या. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मेघदूत वसाहत उभारण्यात आली. प्रत्येकी दोन-दोन मजल्याच्या तीन इमारती मेघदूत वसाहतीत आहेत. तिसऱ्या मजल्यावर असणारी गच्ची सिमेंटचे पत्रे टाकून आच्छादण्यात आली आहे. पावसाचे पाणी गच्चीत साठून वसाहतीमधील इमारतींना गळतीचा (लिकेज) धोका पोहोचू नये हा गच्चीला सिमेंटच्या पत्र्यांनी झाकण्याचा मूळ हेतू होय. प्रत्येक इमारतीत ५०० ते ६०० चौरस फुटांच्या १८ सदनिका आहेत अशा एकूण ५४ सदनिका मेघदूत वसाहतीत आहेत. वसाहतीत प्रवेश केल्यावर मध्यभागी असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा इमारतींची रचना करण्यात आली आहे. दोन इमारतींमध्ये पुरेशी मोकळी जागा असल्याने पार्किंगची समस्या आजही मेघदूतवासीयांना जाणवत नाही. ४५ वर्षांपूर्वी विकासकाने दाखवलेली दूरदृष्टी आज उपयोगी पडत आहे.
मुबलक पाणीपुरवठा
मेघदूत वसाहतीच्या चारही बाजूने पक्की भिंत बांधण्यात आली आहे. वसाहतीत वृक्षराजीसोबतच फुलझाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी साठविण्यासाठी प्रत्येक इमारतीवर दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच वसाहतीच्या आवारात मोठी पाण्याची टाकी आहे. जेणेकरून ठाण्याच्या इतर वसाहतीत अभावानेच असणारा २४ तास पाणीपुरवठा मेघदूत वसाहतीत आहे. त्यामुळेच अजून मेघदूत वसाहतीत पर्जन्य जलसंधारण योजना राबविण्यात आली नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या निमित्ताने वसाहतीतील रहिवासी एकत्र येतात आणि सहभोजनाचा आस्वाद घेतला जातो. वसाहतीत उत्कृष्ट गायक आणि वादक आहेत. त्यांच्या मैफली या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगतात. ओला-सुका कचरा वेगवेगळा करून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा उपक्रम वसाहतीतील महिलांनी राबविला होता. मात्र काही कारणाने तो अपयशी ठरला. तो उपक्रम पुन्हा कार्यान्वित करण्याचा मेघदूतवासीयांचा मानस आहे. ४५ वर्षांपूर्वी जेव्हा मेघदूत उभारण्यात आले, तेव्हापासून आजतागायत वसाहतीत राहणारी अनेक कुटुंबीय आहेत. त्यापैकी वंदना गोळे, वसंत साठे, प्रभाकर फडके आणि नलिनी मराठे ही कुटुंबीय मेघदूतमध्ये आजही वास्तव्याला आहेत.
पन्नास रुपयांची सदनिका
 १९७०मध्ये अवघ्या ५० रुपयांत खरेदी केलेल्या सदनिकेला आज ७० ते ७२ लाख रुपयांपर्यंतचा भाव आल्याचे मेघदूतच्या उभारणीच्या काळापासून मेघदूतचे रहिवासी असणाऱ्या पुरुषोत्तम रानडे यांनी सांगितले. वसाहतीत पाच ते सहा वर्षांतून एकदा डागडुजीचे आणि दुरुस्तीचे काम केले जाते. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही मेघदूत चिर‘तरुण’ म्हणून उभी आहे. मात्र येत्या काही वर्षांत मेघदूतच्या अंगणात पुनर्विकासाचे वारे वाहण्याची शक्यता मेघदूतवासीयांनी व्यक्त केली.

बाहेरील समस्यांचा जाच
मेघदूतच्या उभारणीच्या काळात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने वसाहतीच्या आवारातच नाममात्र दराने (लीजवर) सबस्टेशन उभारले होते. काळाच्या ओघात आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या वसाहतींना या सबस्टेशनमधून विजेच्या जोडण्या देण्यात आल्या. मात्र सबस्टेशनची महाराष्ट्र विद्युत महामंडळाकडून पुरेशी देखभाल न करण्यात आल्याने वारंवार लहान-मोठय़ा दुर्घटना होतात. शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मरचा अनेकदा स्फोट होतो. त्याचा नाहक त्रास मेघदूतवासीयांना होतो. पावसाळ्यात सबस्टेशनची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था होते. यामुळे परिसराची वीज गायब होण्याच्या घटना घडतात. पावसात सबस्टेशनमध्ये पाण्याची गळती होते. भविष्यात यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबस्टेशनच्या आवारात वसाहतीबाहेरील रहिवासी जुनाट सामान आणून टाकतात. त्यामुळे त्या भागाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी नाममात्र दराने (लीज) महाराष्ट्र विद्युत महामंडळाने सबस्टेशनची जागा पदरात पाडून घेतली. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्यात वाढ करण्याची मागणी वारंवार मेघदूतवासीय महाराष्ट्र विद्युत महामंडळाकडे पत्रव्यवहार स्वरूपात करत असतात. मात्र मेघदूतवासीयांच्या पदरी आजतागायत निराशाच पडली आहे. वसाहतीबाहेरील मुख्य रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले. रस्त्याच्या रुंदीप्रमाणे त्यावर गतिरोधक नसल्याने वसाहतीतील वृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीस्वारांचा त्रास सहन करावा लागतो, असे मेघदूत वसाहतीचे कार्यवाहक रंजन शिंदे यांनी सांगितले.
विनित जांगळे