ठाकुर्लीच्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ९ वर पोहचली आहे.  मंगळवारी रात्री येथील चोळे गावात असणारी मातृकृपा ही पन्नास वर्षे जुनी तीन मजली इमारत कोसळली होती. त्यानंतर अग्निशामन दलाकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले होते. काल रात्रीपासून सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत सातजणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
कालपासून अग्निशामन दल, एनडीआरएफचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. मात्र, काही काळासाठी पावसामुळे मदतकार्यात वारंवार अडथळे येत होते. १९७२ साली बांधण्यात आलेल्या या इमारतीत एकूण २७ कुटुंबे राहत होती. दोन दिवसांपूर्वीच इमारतीची धोकादायक स्थिती पाहून पाच कुटुंबांनी दुसरीकडे स्थलांतर केले होते. मीरानगरमधील लोड बेअरिंगच्या या इमारतीत २० कुटुंबे राहत होती. मंगळवारी रात्री इमारतीचा पाया खचला. चोहोबाजूने पाणी झिरपत असल्याने ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इमारत हादरल्याची जाणीव इमारतीतल्या काही रहिवाशांना झाली. त्यांनी तात्काळ अन्य रहिवाशांना घराबाहेर पळण्याची सूचना केली. काही रहिवासी इमारतीबाहेर पडत असतानाच इमारत कोसळली. लोकांनी इमारतीचे ढिगारे उपसून अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.