कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची निवडणूक येत्या महिन्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांना आता विकास कामे पूर्ण करण्याची घाई झाली आहे. यात नागरिकांच्या हितापेक्षा स्वहिताचा अधिक विचार केल्याचेच चित्र आहे. मोहनानंदनगर पूल ते हेंद्रेपाडा या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे, परंतु या रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता मात्र अरुंदच आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांर्तगत शहरातील १० रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. यासाठी पालिकेला निधी उपलब्ध झाला असून ८० टक्के राज्य सरकार आणि २० टक्के नगरपालिका खर्च करणार आहे. यातील बहुतेक रस्त्यांचे काम सुरू असून ते प्रगतिपथावर आहे. पश्चिमेकडील बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. ती टाळण्यासाठी गांधी टेकडी ते हेंद्रेपाडा हा पर्यायी रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी सुमारे पाच कोटी ३१ लाख ४७ हजार ८०५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मोहनानंदनगर ते जॉगर्स पार्क, हेंद्रेपाडा या रस्त्याचे ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच बाजरपेठतून हेंद्रेपाडा साईबाबा मंदिरापर्यंतच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पालिकेच्या निधीतून करण्यात येणार आहे.
हेंद्रेपाडय़ात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथे शाळा, महाविद्यालय, रेनी रिसॉर्ट असल्याने या ठिकाणची रहदारी वाढली आहे. त्याप्रमाणात येथील रस्ते अरुंदच आहेत. मुख्य रस्ता अरुंद आणि त्यांना जोडणारा रस्ता मजबूत आणि रुंद असा विरोधाभास सध्या जाणवत आहे. कारण लालबहादूर शास्त्री मार्ग हा रस्ता २० ते २५ फूटच आहे. विकास आराखडय़ात असूनदेखील या रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले नाही. परिणामी नवीन काँक्रीट रस्ता आणि शास्त्रीमार्ग, तसेच बाजरपेठेतून येणारा रस्ता ज्या ठिकाणी जोडला जाणार आहे, तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीसह अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण ज्या ठिकाणी हे रस्ते जोडले जाणार आहेत, तेथे जोडरस्त्यावरून येणारी वाहने दिसणार नाहीत.
एका ठिकाणी मोठा बंगला आणि दुसऱ्या ठिकाणी पालिकेने अनधिकृत ठरवून पाडलेले आणि पुन्हा दिमाखात उभे असलेले बांधकाम आहे. तसेच जॉगर्स पार्कजवळ तिन्हींमार्ग जोडले जाणार आहेत, ते ठिकाण अरुंद आहे. या अडथळ्यांमुळे वाहनांचा अंदाज पादचारी आणि वाहन चालकांना येणार नाही. हे एकाप्रकारे अपघाताला आमंत्रणच ठरणार आहे. तर लालबहादूर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव नसल्याने हा रस्ता आहे तसाच राहणार असल्याचे पालिका आधिकाऱ्याने सांगितले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

रस्ता गायब?
पालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात या विकास आराखडय़ानुसार किती रस्ते तयार करण्यात आले, तसेच प्रत्यक्षात किती आरक्षणे हटविण्यात किंवा बदलण्यात आली हा आता संशयाचा विषय झाला आहे. विकास आराखडय़ातील काही आरक्षणे बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींच्या सोयीनुसार करण्यात आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गांधी टेकडी ते हेंद्रेपाडय़ातून बॅरेज रस्त्याला जोडणारा रस्ता विकास आराखडय़ात प्रस्तावित होता. या रस्त्याला स्थानिक नागरिकांनी हरकत घेतली होती, मात्र ते आरक्षण हटविण्यात आले नाही. पालिकेने प्रत्यक्षात रस्ता करताना गांधी टेकडी ते टाटा पॉवर लाइन खालून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे विकास आराखडय़ातील रस्ता कोणी गायब केला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेने नागरिकांच्या हरकती न जुमानता रस्त्याचे आरक्षण कायम ठेवले आहे. परिणामी अनेकांचे नुकसान झाले आहे. याला अधिकारी जबाबदार आहेत, की राजकीय मंडळी असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
समीर पारखी, बदलापूर