इकबाल कासकर याच्या चौकशीतून स्पष्ट

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पकिस्तानमध्ये वास्तव्य करत असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यामध्ये आता तथ्य असल्याचे इकबाल कासकर याच्या चौकशीतून स्पष्ट होत आहे. पाकिस्तानमधील कराची येथील क्लिफ्टन भागात दाऊदचे तीन बंगले आहेत. त्यापकी एकामध्ये दाऊद आणि अनीस हे दोघे एकत्र राहतात, तर उर्वरित बंगल्यात त्याचे साथीदार राहतात, अशी माहिती इकबाल याने ठाणे पोलिसांच्या चौकशीत दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या इकबालची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीत त्याने पाकिस्तानमधील कराची येथील क्लिफ्टन भागात दाऊदचे तीन बंगले असल्याची माहिती दिली आहे.

दाऊदचे ऐकले असते तर..

दाऊदच्या भेटीदरम्यान त्याने दुबईलाच थांब आणि मुंबईला जाऊ नकोस असे सांगितले होते. पण तेव्हा त्याचे ऐकले नाही. त्याचा आता पश्चात्ताप होतो आहे, असेही इकबाल याने चौकशीत सांगितले आहे. तसेच पाच ते सहा वर्षांपूर्वी कारागृहातून बाहेर आल्यानंतर दाऊद याने तीन ते चार वेळा दूरध्वनी केले होते आणि त्यामध्ये नशापान करू नकोस आणि व्यवस्थित राहा असा सल्ला दिला होता, असेही इकबाल याने चौकशीत सांगितले आहे.