विक्रीकर खात्याची कारवाई

शासनाचा महसूल कर थकविल्याप्रकरणी विक्रीकर खात्याने मुंब्रा येथील दोन कंपनी मालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. तस्लीम धानेरीवाला व अब्दुल वहीद अब्दुल रेहमान कासू या दोन कंपनी मालकांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद कोळीवाडा येथे तस्लीम मस्तान टी. धानेरीवाला यांची मॉडर्न ट्रेडर्स नावाची कंपनी आहे. धानेरीवाला यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाचा ८७ लाख ५३ हजार १९६ रुपये महसूल कर व त्यावरील वार्षिक १५ टक्के व्याज थकविले आहे. शासनाचा कर थकविल्याप्रकरणी साहाय्यक विक्रीकर आयुक्त अतुल घुसळे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात शनिवारी धानेरीवाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत अब्दुल वहीद अब्दुल रेहमान कासू यांचे कौसा येथील नशेमन कॉलनी येथे क्लुडी सेल्सचे कार्यालय आहे. कासू यांनी शासनाचा ४८ लाख २४ हजार ५१० रुपये व त्यावरील वार्षिक १५ टक्के व्याज इतका कर बुडविला. या प्रकरणी कासू यांच्याविरोधात घुसळे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गाडीचा टायर फुटून ठाण्यात १३ जखमी

ठाणे : दहिसर येथे साखरपुडय़ासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळीच्या गाडीचा अपघात होऊन १३ जण जखमी झाल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली. दुपारी चारच्या सुमारास ओवळा नाका येथे हा अपघात झाला असून जखमींना ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यातील काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचारानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले आहे. तर दोन रुग्ण हे ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ठाण्यातील वर्तकनगर व भीमनगर परिसरात खरात, पटेकर हे कुटुंब राहतात. या दोन्ही कुटुंबीयांच्या एका नातेवाईकाचा रविवारी दहिसर येथे साखरपुडा होता. त्यासाठी ही दोन्ही कुटुंबे दोन वाहनांमधून दुपारी दहिसरला जात होती.

दरम्यान ओवळा नाका येथे एका वाहनाचा टायर फुटून अपघात झाला. यामध्ये आसराबाई मस्के (७०), मथू येडे (६०), रुक्मिणी पाईकराव (७०), मीरा खरात (२८), राणू पटेकर (५७), लता खरात (५५), निखिल आठवले (१२), कमल खरात (५०), मारुती खरात (२६), शीतल खरात (१०), विशाल खरात (०५),  पिंकी पटेकर (३०), ओशाबाई पटेकर (६५) हे १३ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील नागरिक हे किरकोळ जखमी असून काही जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी हलविले आहे. ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दोन जणांवर उपचार सुरू असल्याचे शल्यचिकित्सक बी. सी. केम्पी पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.