कल्याणमधील वाहतूक कोंडीने नागरिक, वाहन चालक हैराण झाले आहेत. रेल्वे स्थानक भागातील रस्ते वाहतूक कोंडीने गजबजले आहेत. या वाहतुकीला शिस्त लावण्यात स्थानिक वाहतूक विभाग, आरटीओ यंत्रणेला अपयश येत असताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘कल्याणमधील वाहतुकीला शिस्त लावली’ असे प्रशस्तिपत्रक देत महापौर कल्याणी पाटील यांनी पोलीस उपायुक्त डॉ.रश्मी करंदीकर यांचा सत्कार घडवून आणला. महापौरांच्या या निर्णयाने नगरसेवकांसह सर्वसामान्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
डॉ. रश्मी करंदीकर यांनी ठाणे वाहतूक पोलीस विभागाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा पेच सोडवणे त्यांना अद्याप जमलेले नाही. रेल्वेस्थानक परिसरात सदासर्वकाळ वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. स्थानकाच्या पश्चिमेकडे रिक्षाचालकांची मनमानी आणि सहा आसनी रिक्षाचालकांकडून सुरू असलेली बेकायदा प्रवासी वाहतूक यांनी या कोंडीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्वीपेक्षा बिघडू लागली आहे. लालचौकी ते पत्रीपुलापर्यंतचे चौक वाहतूक कोंडीने गजबजलेले असतात. असे असताना ‘कल्याणच्या वाहतुकीला शिस्त लावली’ असे प्रशस्तिपत्र महापौरांनी कोणत्या आधारावर दिले, असा सवाल विचारण्यात येत आहे.
कल्याणमधील वाहतुकीत सुसूत्रता आणून प्रभावी कामगिरी पार पाडल्याबद्दल उपायुक्त करंदीकर यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गौरविण्यात आले. महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते हा गौरव सुरू असताना काही नगरसेवक खासगीत नाराजी व्यक्त करताना दिसत होते. कल्याणच्या वाहतूक व्यवस्थेची अवस्था नेमकी कशी आहे हे सर्वानाच ठावूक आहे. वाहतुकीला शिस्त लागली म्हणजे काय झाले, हादेखील संशोधनाचा विषय आहे. असे असताना या सत्काराची घाई कशासाठी आणि कुणासाठी असा सवाल काही ज्येष्ठ नगरसेवकानी ठाणे लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला.