मासे प्रदूषित झाल्याचे वृत्त अफवाच; मच्छीमार सोसायटय़ांचे स्पष्टीकरण

तेल प्रदूषणामुळे मासे मृत होऊन किनाऱ्यावर येत असून समुद्रातील मासेही प्रदूषित झाले आहेत ही केवळ अफवा असल्याचे वसईतील मच्छीमार सोसायटय़ांनी स्पष्ट केले आहे. मोसमी वाऱ्यांची दिशा बदलल्याने काही मासे मृत होऊन किनाऱ्यावर आले आहेत. लोकांनी बिनधास्त मासे खावेत, असे आवाहन मच्छीमार सोसायटय़ांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तेल प्रदूषणामुळे मासे मरत असल्याचे वृत्त पसरले आहे. त्यामुळे मत्स्यप्रेमींनी त्याचा धसका घेत सध्या मासे खाणे बंद केले आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचे मच्छीमार संघटनांनी स्पष्ट केले आहे. मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला की समुद्रातील पाण्याचा प्रवाह बदलतो. यामुळे अनेक सागरी जीव किनाऱ्यावर लागत असल्याच्या घटना घडतात, असे सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांनी नोंदवलेल्या निरीक्षणाचा हवाला देत मासे चांगले असल्याचे वसईतील मच्छीमार सोसायटय़ांनी स्पष्ट केले आहे. सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूटचे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांच्या मते, या काळात समुद्राच्या पाण्याचा रंगही बदलतो. त्याला मच्छीमार लोक ‘सारगीचे पाणी’ म्हणतात. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला की ते वारे सागराच्या पोटात असलेल्या ऑक्सिजनच्या थराला ढकलण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पाण्याचे फुगवटे तयार होत असल्याने दक्षिणेकडे जाणारा प्रवाह तयार होतो आणि समुद्राच्या खोल तळातील पाणी वर येते आणि त्याबरोबरीने किमान ऑक्सिजनचा थरही वरच्या बाजूस येतो. या थरामध्ये ज्यावेळी सागरी जीव येतात. त्यावेळी त्यांना ऑक्सिजनच्या कमतरतेने श्वसनाचा त्रास होतो आणि त्यांचा मृत्यू होऊन ते किनाऱ्यावर येतात. या बदलाला सागरी प्रदूषण कारणीभूत नसून असा प्रकार दरवर्षीच घडतो. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त असते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

वसई मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन संजय कोळी यांनीही ही अफवा असल्याचे म्हटले आहे की, आम्ही दररोज मासे खातोय. परंतु हे मासे खाल्ल्याने आम्हाला किंवा इतरांना काही त्रास झाल्याची एकही घटना घडली नाही, तरीही लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि बिनधास्तपणे मासे खावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.