जागा आणि यंत्रणेअभावी बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगरात कचरा प्रक्रिया नाही

वाढत्या लोकसंख्येसोबत अंबरनाथ, बदलापूर आणि महापालिका असलेल्या उल्हासनगर शहराचा कचराप्रश्न गंभीर बनला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने या तिन्ही शहरांचा कचरा घराघरांतून उचलून फक्त कचराभूमीवर टाकणे एवढीच प्रक्रिया केली जाते. मात्र कचराभूमीवर साचलेला कचरा, त्यात आग लागण्याचा वाढलेल्या घटना आणि आसपासच्या नागरिकांवर त्याचा झालेला परिणाम चिंताजनक आहे.

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे येथे निर्माण होणारा कचराही वाढला आहे. अंबरनाथ शहरातून दिवसाला १३० ते १४० टन कचरा तयार होत असतो तर बदलापूर शहरात प्रतिदिन ७० ते ७५ टन कचरा तयार होत असतो. बदलापूर शहरातील कचरा हा शहराबाहेर असलेल्या कचरा भूमीवर टाकला जातो. मात्र अंबरनाथ शहराच्या कचराभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्याशेजारी बेकायदा जागेवर अंबरनाथ शहरातील कचरा गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो आहे. कचऱ्याला आग लागण्याच्या प्रकारांमुळे या कचराभूमीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. एप्रिल आणि मे महिन्यात येथील कचराभूमीला आग लागण्याचा घटना वाढलेल्या असतात. त्यात शेजारून जाणाऱ्या महामार्गावरील वाहनांनाही येथील निघणाऱ्या धुराचा फटका बसत असतो.

अशीच काहीशी परिस्थिती उल्हासनगर शहराचीही झाल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. उल्हासनगर शहराची लोकसंख्या पाहता येथे दिवसाला ४०० टनाहून अधिक कचरा भूमीवर टाकला जातो. यात म्हारळ ग्रामपंचायतीला लागून असलेल्या कचराभूमीची क्षमता संपल्याने इतर जागा उपलब्ध नसल्याने उल्हासनगरच्या कॅम्प-५ येथील जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र इथेही शिवसेनेच्या वतीने नुकताच मोर्चा काढून विरोध करण्यात आला आहे. म्हारळजवळील कचराभूमीवरही अनेकदा आग लागण्याचे प्रकार वाढले होते. तसेच क्षमता संपल्याने अनेकदा हा कचरा आसपासच्या घरांसाठी कर्दनकाळही ठरला होता. त्यामुळे येथेही कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यात उल्हासनगर कॅम्प-५ च्या कचराभूमीवरही जीन्स कारखान्यातून चिंध्या टाकल्या जात असल्याने येथे आग लागण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे आयुक्तांनी चिंध्या टाकण्यावर र्निबध घातले होते. मात्र त्यानंतरही या कचराभूमीवर चिंधी टाकण्याचे प्रकार काही थांबले नव्हते. त्यामुळे कचराप्रश्नी उल्हासनगर महापालिकाही तोडगा काढू शकली नाही.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या एका बैठकीत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वीही एमएमआरडीएने अशा दोन ते तीन शहरांचा मिळून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच केले होते. मात्र त्यानंतरही यावर ठोस काही झालेले दिसले नाही. पालिकांची आर्थिक स्थिती आणि जागेचा प्रश्न सुटत नसल्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प रेंगाळल्याचे बोलले जाते.