कल्याण रेल्वे स्थानकातून कल्याण पूर्वेकडील दिशेने जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे कोंडीचा सामना करावा लागत असून रेल्वेच्या मालगाडय़ांमुळे येथील नागरिकांना तासन्तास खोळंबा सहन करावा लागतो. रेल्वे यार्डातील हा मार्ग नागरिकांसाठी अडथळ्याची वाट ठरत आहे. अनेक वेळा थांबलेल्या गाडीच्या खालून वाकून जाण्याचा प्रयत्न नागरिक करत असल्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार अपघातास निमंत्रण देणारा असून रखडलेल्या स्कायवॉकच्या कामामुळे ही कोंडी दिवसेंदिवस अधिकच उग्र बनू लागली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून पूर्वेकडील दिशेने बाहेर जाण्यासाठी मोठय़ा रेल्वे यार्डाचा मार्ग पार करावा लागतो. हे रेल्वे रूळ माल वाहतुकीसाठी वापरले जात असून ते ओलांडण्यासाठी सब-वे किंवा पुलाचा पर्याय उपलब्ध नाही. शिवाय कल्याण जंक्शनमध्ये मोठय़ा प्रमाणात मालगाडय़ाची वाहतूक होत असून त्या याच मार्गातून पुढे जातात. मात्र अनेक वेळा या गाडय़ांना मोकळा मार्ग मिळत नसल्याने या गाडय़ा यार्डामध्येच खोळंबून पडलेल्या असतात. त्यामुळे यार्डातून बाहेर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होत असून तासन्तास या गाडय़ा पुढे सरकत नाहीत. त्यामुळे काही नागरिक मालगाडय़ांच्या खाली मोकळ्या असलेल्या जागेतून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारामुळे मोठय़ा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरू असलेल्या स्कायवॉकचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रखडलेला स्कायवॉक मार्गी लावण्याची गरज
या भागातील स्कायवॉकला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये मोठी चढाओढ लागली होती. मात्र तो अद्याप  पूर्णही होऊ शकलेला नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतील स्कायवॉक मार्गी लावण्याची गरज असल्याचे या भागातून प्रवास करणारे मनीष कदम यांनी व्यक्त केली आहे.
श्रीकांत सावंत, ठाणे