ठाणे पालिकेच्या आयुक्तांचे आदेश; पावसाचे पाणी तुंबून जीवितहानी होण्याची शक्यता
ठाणे शहरातील नाल्यांवर उभ्या राहीलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई होऊ नये यासाठी महापालिकेतील राजकीय पदाधिकारी कामालीचे आग्रही असताना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र पावसाचे पाणी तुंबून जीवितहानी होऊ नये यासाठी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाला दिले.
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अशा बांधकामांमुळे वाढते आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामासोबत नाल्यावरील सर्व बांधकामे जमीनदोस्त करावेत, असे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील नाल्यांवर सुमारे दहा हजारांहून अधिक बांधकामे उभी आहेत. काही ठिकाणी तर ही बांधकामे नाल्यांच्या मधोमध भराव टाकून करण्यात आली आहेत. या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी नाल्याच्या प्रवाहावर प्रतिकूल परिणाम झाला असून पाणी तुंबण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी ही बांधकामे पाडावीत असा आग्रह धरला. त्यावर अशा बांधकामांवर कारवाई केल्यामुळे पुनर्वसनाचा मोठा प्रश्न उपस्थित होणार असल्याने यासंबंधीचा ठोस ठराव करावा, असा गुगली जयस्वाल यांनी नगरसेवकांना टाकला होता. मात्र, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या तोंडावर मतपेटीला धक्का बसू नये यासाठी नगरसेवकांना असा ठराव केला नाही. त्यामुळे नाल्यांवरील बांधकामांना अभय मिळते की काय, असे चित्र उभे राहिले होते.

कारवाई होणारच
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाच्या अनुषंगाने जयस्वाल यांनी बुधवारी सकाळी अतिक्रमण विभाग, घनकचरा विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. नालेसफाईची कामे प्रभावीपणे व्हावीत यासाठी या बैठकीत आग्रह धरण्यात आला. मात्र बेकायदा बांधकामांचा अडखळा अनेक ठिकाणी येत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. त्यावर ही बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करावी, असे आदेश जयस्वाल यांनी दिले. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपनगर अभियंता दत्तात्रय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नालेसफाईची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांत नालेसफाईच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी चांगला पाऊ स होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, तसेच नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्येही काही नगरसेवकांनी किमान नाल्यावरील बांधकामांवर तरी कारवाई करण्यात यावी, असे सूचविले होते. यावेळी यापूर्वी महासभेने नाल्यावरील बांधकामे पाडण्याबाबत ठराव केल्याचेही काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. या पाश्र्वभूमीवर ही बांधकामे जमीनदोस्त करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
भरपाई नाही
नाल्यावरील बांधकाम तोडल्याच्या बदल्यात संबंधितास कुठलीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही अथवा त्यांचे पुनर्वसनही करण्यात येणार नसल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. या कामाच्या नियंत्रणासाठी उपनगर अभियंता मोहिते यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून नगर अभियंता रतन अवसरमोल यांना प्रभाग समिती निहाय नाल्यावरील बांधकामाची यादी संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.