निवडणुकीनंतर विक्रेत्यांची लगबग सुरू; आगाऊ नोंदणीत ३० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचा दावा

ठाणे महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्कंठा असली तरी, शहरातील पुष्पगुच्छ विक्रेते, मिठाईवाले, फटाके दुकानदार मात्र बुधवारपासूनच जय्यत तयारीत आहेत. आचारसंहितेमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी असल्याने गेल्या महिनाभरापासून व्यवसाय घटल्याची ओरड पुष्पगुच्छ विक्रेत्यांकडून सुरू होती. निकालाच्या दिवशी मात्र धंदा तेजीत असेल, अशी आशा असल्याने विक्रेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

मतदानाचा दिवस सरताच मिठाई, फटाके, पुष्पगुच्छांची आगाऊ नोंदणीत वाढ झाल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली. इतर दिवसांच्या तुलनेत ही वाढ ३० टक्क्यांहून अधिक आहे, असा दावा काहींनी केला. निवडणूक प्रचाराच्या काळात ढोल-ताशे पथकांना ‘अच्छे दिन’ होते. गुरुवारी निकालानिमित्त विजयाची खात्री असलेल्या काही उमेदवारांनी मिरवणुकांची तयारी सुरू केली असून त्यामुळे ढोल-ताशे पथकांची आगाऊ नोंदणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ढोल पथकातील २०-२५ सभासद दररोज वादनाचा सराव करीत आहेत. नोटाबंदीमुळे यंदा निवडणूक प्रचारात पूर्वीइतके काम मिळाले नसले तरी अखेरच्या काही दिवसांत मात्र बऱ्याच उमेदवारांकडे नोंदणी मिळाली. दरम्यान, जिंकण्याचा ठाम विश्वास असलेल्या एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने आम्हाला निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच नोंदणीची आगाऊ रक्कमही दिली आहे, अशी माहिती श्रीनगर येथील नादस्त्र ढोल-ताशा पथकाचे सुमुख कांबळी यांनी सांगितले. आचारसंहिता आणि निवडणूक काळात पुष्पगुच्छ विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात घटले होते, अशी माहिती मूळ ठाण्यातील एका बडय़ा पुष्पगुच्छ विक्रेत्याने दिली. निकाल लागताच विक्रीत वाढ होईल. त्यामुळे दररोज १०० पुष्पगुच्छ बनवीत होतो. त्यात ३० ते ४० पुष्पगुच्छांची वाढ केली आहे, अशी माहिती या विक्रेत्याने दिली.

मिठाईवाल्यांच्या दुधात साखर

इतर दिवसांच्या तुलनेत आम्ही मिठाई बनविण्याची क्षमता वाढवली असली तरी त्यांच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गुरुवारी निकालाचा दिवस असल्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही मिठाईच्या विक्रीत वाढ होणार आहे. यंदा निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महाशिवरात्री असल्याने उत्पादनक्षमता नेहमीच्या तुलनेत वाढवली आहे, अशी माहिती ठाण्यातील एका प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याने दिली.