२७ टक्के उमदेवारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे; एकूण ५०६ पैकी ८१ उमेदवारांवर गुन्हे

मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक लढवत असलेल्या ५०६ उमेदवारांपैकी ८१ म्हणजेच १६ टक्के उमेदवारांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ५७ उमेदवारांवर अपहरण, खंडणी, चोरी, धमक्या देणे, फसवणूक आदी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपने २७ टक्के आणि त्यापाठोपाठ शिवसेनेने १८ टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉम्र्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने केलेल्या ५०९ पैकी ५०६ उमेदवारांच्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. या ८१ उमेदवारांमध्ये ५७ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपने या निवडणुकीत ९३ उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी २५ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेने उभ्या केलेल्या ९४ पैकी १८ (२० टक्के), काँग्रेसच्या ७४ पैकी १० (१४ टक्के), राष्ट्रवादीच्या ६३ पैकी ९ , बहुजन विकास आघाडीच्या २७ उमेदवारांपैकी ३ , मनसेच्या २४ पैकी २ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

२०९ उमेदवार कोटय़धीश

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ५०६ उमेदवारांपैकी तब्बल २०९ उमेदवार कोटय़धीश आहेत. भाजपचे ६८ टक्के, शिवसेनेचे ६३ टक्के, काँग्रेसचे ५४ टक्के, राष्ट्रवादीचे १६ टक्के, बहुजन विकास आघाडीचे १९ टक्के, मनसेचे २१ टक्के  उमेदवारांची संपत्ती कोटय़वधी रुपयांची आहे, तसेच आरपीआय, समाजवादी पक्ष आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार कोटय़धीश आहेत. या उमेदवारांची सरासरी संपत्ती सुमारे २ कोटी ४६ लाख रुपये इतकी असून शिवसेनेचे हरीश बाबुलाल अगरवाल हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. भाईंदर पश्चिम येथील ‘२३ ड’ या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या अगरवाल यांनी स्वत:ची संपत्ती ६७ कोटी इतकी असल्याचे शपथपत्रात घोषित केले आहे. याव्यतिरिक्त सर्वात कमी संपत्ती असलेले २१ उमेदवार असून त्यांनी आपली संपत्ती ३ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे घोषित केले आहे.

७१ टक्के उमेदवारांचे शिक्षण १२वी पेक्षाही कमी

शिक्षणाच्या बाबतीत बोंबाबोंबच आहे. तब्बल ७१ टक्के उमेदवारांची शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण किंवा त्याखालची आहे. यात ४ टक्के उमेदवार अशिक्षित, ८ टक्के उमेदवार ५ वी उत्तीर्ण, २० टक्के उमेदवार ८ वी उत्तीर्ण, २३ टक्के उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि १६ टक्के उमेदवार १२ वी उत्तीर्ण आहेत. पदवीधर असलेल्या उमेदवारांची संख्या १६ टक्के, व्यावसायिक पदवीधर असलेले ३ टक्के, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६ टक्के आहेत. ३ टक्के उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता घोषित केलेली नाही.

तरुण उमेदवार २ टक्के   

सर्वाधिक तरुण उमेदवारांची संख्या केवळ २ टक्के आहे. यात ११ उमेदवारांचे वय २१ ते २४ या दरम्यान आहे. ८ टक्के उमेदवार २५ ते ३०, २८ टक्के उमेदवार ३१ ते ४०, ४० टक्के उमेदवार ४१ ते ५०, १७ टक्के उमेदवार ५१ ते ६०, ४ टक्के उमेदवार ६१ ते ७० या वयोगटातील आहेत आणि दोन उमेदवारांचे वय ७१ ते ८० या वयोगटातील आहे.

५०६ उमेदवारांमध्ये २७९ (५५ टक्के) उमेदवार पुरुष आणि २२६ (४५ टक्के) स्त्री उमेदवार आहेत.