पारंपरिक ख्रिस्ती समाजाच्या घरांची रचना ही वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण होती. घराच्या रचनेनुसारच त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू असायच्या. दागिन्यांची  चोरखण, खजुराच्या झाडापासून बनवलेली चटई म्हणजे आथरी, टिपा, घुंगूरकाळी, पांगुळगाडा, विवाहप्रसंगी वाजविण्याचे वाद्य म्हणजे घुमट अशा अनेकविध वस्तूंचा समावेश आहे.

कोकणातील वातावरणानुसार जुन्या वसईतील स्थानिकांची कौलारू घरे आहेत. मात्र पूर्वी ती आकाराने भव्य होती म्हणजेच आता त्या एका घराच्या जागेत चार बंगले बनतात. एवढी मोठी घरे एकत्र कुटुंबासाठी बनवलेली होती. या घरांवर चौखापी छप्पर असे. ही घरे दगड, चुना, गूळ आणि मध इत्यादींपासून बनवलेली असत. हे वसईतील बांधकामाचे वैशिष्टय़ होते. त्याला दगडाच्या पायऱ्या, पोट-ओटा, प्रशस्त ओटा, पडवी, ओसरी, अंगास (झोपण्याची जागा), स्वयंपाकघर, शिडी लावलेला माळा, अंगण, परस आणि मजबूत प्रवेशद्वार अशा प्रकारचे घर असे. ईस्ट इंडियन समाजातील घरांत लाकडी काम जास्त केले जाई. कोळी आणि इतर मच्छीमार समाजाची घरे तात्पुरत्या स्वरूपाची आणि कायम स्वरूपाची असत.

घराच्या ओटीवर किंवा ओसरीवर मध्यभागी उंच कमानीचे, लाकडी चर्चची नक्षीदार प्रतिकृती असलेले आल्तार (देव्हारा) असे. त्यात लाकडी किंवा मातीच्या मूर्ती म्हणजेच इमाजी ठेवल्या जात असत. काही घरांत सतत जळती मेणबत्ती आल्तारासमोर ठेवली जात असे. आता काचेचे आल्तार बनवले जाते आणि त्यासमोर विजेवरील दिवा ठेवला जातो.

घराच्या ओटीवर झोपाळा असे त्याला माशी असे म्हटले जाते. आयताकृती किंवा चौकोनी मजबूत लाकडाची चौकट, त्यामध्ये सुंभाने विणलेली वीण असे. या हिंदोळ्यावर बसून सणासुदीला गाणी म्हटली जात होती. काही लोकांच्या घरी लाकडी फळीचे हिंदोळे असत. अजूनही घराच्या ओटीवर हिंदोळे लावण्याची प्रथा येथे चालू आहे. मात्र झोपाळ्यांची रचना बदललेली दिसते.

पूर्वी घरोघरी नळ नव्हते, त्या वेळी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पोहऱ्याचा (लोखंडी लहान बादली) वापर केला जात असे. पोहरा कधी विहिरीत पडला तर तो काढण्यासाठी गळ वापरला जात असे. गोलाकार लोखंडी गळाला तारेचे हूक अडकवलेले असत. स्वयंपाक, पिण्यासाठीचे आणलेले पाणी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात विशेष दोन कप्प्यांचे लाकडी टेबल असे, ज्यास पाणेरी असे म्हटले जाते. त्यावर हंडे-कळशी ठेवण्यात येत. पिण्यास पाणी घेण्यासाठी नारळाच्या करवंटीपासून बनवलेला भुड्डा किंवा ओगराळे वापरले जात होते. नारळाच्या करवंटीवरील ३० टक्के भाग काढून त्यात लोखंडी सळी तापवून करवंटीला होल करून त्यात लावली जात असे. हा भुड्डा आंघोळीसाठीही वापरला जात असे.

वसईतील लोकांचा कणेर किंवा कणेरी (पेज) हा आवडता पदार्थ होय. पेज किंवा रस्सा घेण्यासाठी उळकीचा वापर केला जात असे. नारळाच्या करवंटीला तासून त्याला बांबूची काठी लावली जात असे. पूर्वी भाकरी बनवण्यासाठी खापरीतचा वापर करत असे, तर भाजी शिजवण्यासाठी तिजाल किंवा तवकट वापरले जाई. ही भांडी मातीपासून बनवून मग ती भट्टीत भाजली जात असे. ईस्ट इंडियन घरात तांब्याचे तिजालही वापरत असत. कोळी आणि मच्छीमार समाजातील लोक भाकरी बनविण्यासाठी सानका या लाकडी भांडय़ाचा वापर करत असत. या भागात सणासुदीला तांदळाचे सांदणे बनवले जात होते. त्यासाठी चुलीवर पितळेच्या भांडय़ात पाणी गरम करून त्यावर थाळीत केळीच्या पानावर मिश्रण लावून त्यावर मातीचे कुबड्डर ठेवून पदार्थ शिजवला जातो. कुबड्डर हे भांडे स्टीमरप्रमाणे काम करत होते. त्या काळी शॅलो फ्राय (पिठाचे पोळे- मासे तळण्यासाठी) करण्यासाठी भिनय किंवा शिटाप हे भीडाचे तर तामतय हे तांब्याचे भांडे वापरले जात होते. तपेली किंवा तपयली या अ‍ॅल्युमिनिअमच्या भांडय़ात भात शिजवणे, आंघोळीचे पाणी गरम करणे तसेच बाळ जन्मल्यानंतरच्या विधीसाठी हरभरेदेखील यात उकडले जात होते. त्या काळात शेव बनवण्यासाठी लाकडी शेवेचा घोडा वापरला जात होता. त्याला मध्यभागी छिद्र असलेली चकती लावलेली असे. पूर्वी रोजच्या वापरात उभे, गोल पृष्ठभाग आणि गोल निमुळते तोंड असलेले मातीचे भांडे भात शिजवण्यासठी वापरत. या भांडय़ाला हंडी असे म्हणतात. भातातील पाणी म्हणजेच पेज काढण्यासाठी यावर तांब्याचे गोलाकार व्यास असलेले, ज्याचा वरचा भाग उलटय़ा वाटीसारखा असे त्या भागाला छिद्रे असत. या भांडय़ाचा वापर गाळण्याप्रमाणे केला जात असे. दूध आणि इतर काही पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी शिके किंवा हिक्के वापरले जात असे. काथ्याला विशिष्ट प्रकारे गुंफून बनवले जाते. त्या काथ्याच्या गुंफणात वस्तूंनी किंवा दुधाने भरलेले मडके ठेवत. त्या काळात स्वयंपाकघरात बसण्यासाठी लाकडी पाट वापरत होते. येथील जेवणात ताज्या खोबऱ्याचा वापर मोठय़ा प्रमाणात असे. रोजच्या जेवणातील नारळ मोरलीवर किसला जात होता, तर समारंभाचे जेवण बनवताना किसणी किंवा खवणीवर नारळ किसला जात असे. तेव्हा गरजेनुसार विविध आकारांच्या किसण्या वापरल्या जात होत्या.

(पूर्वार्ध)

@Dishakhatu

दिशा खातू  – disha.dk4@gmail.com