शास्त्रीय संगीताविषयी आवड आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या कलावंतांची संख्या कमी होत असतानाच डोंबिवलीतील फाटक कुटुंब मात्र गेली २०-२२ वर्षे भारतीय संगीत विद्यालयाच्या माध्यमातून कलाकारांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. या विद्यालयाचे संस्थापक किरण फाटक यांनी नुकतीच आपल्या वयाची ६० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी ते करीत असलेल्या कार्याचा आढावा घेणारा एक कार्यक्रम शनिवार, १५ ऑगस्ट रोजी आदित्य मंगल कार्यालय येथे संध्याकाळी ५ वाजता सादर होणार आहे. यानिमित्ताने भारतीय संगीत विद्यालयाचा घेतलेला आढावा..

Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती

ठा णे येथे अशोक टॉकीजच्या समोर १९३७ मध्ये भास्करबुवा फाटक यांनी भारतीय संगीत विद्यालयाची स्थापना केली. भास्करबुवांचे बंधू स्व. रामकृष्ण फाटक हे हार्मोनिअमविशारद होते. त्यांच्या भगिनी स्व. इंदिराबाई केळकर यांचे वांद्रे येथे शारदा संगीत विद्यालय होते. सध्या त्या ठिकाणी नादब्रह्म मंदिर हे पं. विष्णु दिगंबर पलुस्करांचे स्मारक आहे. भास्करबुवा फाटक हे अभ्यासू व उत्तम संगीत शिक्षक होते. भास्करबुवांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे किरण फाटक. घरातच कला असल्याने किरण फाटक यांना अगदी लहान वयातच संगीताचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी गायन, वक्तृत्व आणि अभिनय या तीनही क्षेत्रांत चांगली प्रगती केली. शिक्षण घेता-घेता वयाच्या सोळाव्या वर्षीच संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली. नोकरी करत असताना त्यांनी त्यांच्यातील एक कवी कायम जागृत ठेवला. स्वरांनी व रागदारी संगीताने किरण फाटक यांचे जीवन व्यापून टाकले होते. पं. राम मराठे यांच्या गाण्यांचे संस्कार त्यांच्या गाण्यावर नकळत झाले होते. गणेशोत्सव, विविध स्पर्धामधून भाग घेत फाटक यांनी लहानपणी विविध पारितोषिके पटकाविली. त्यातच १९८२ मध्ये लग्न झाल्यानंतर ते डोंबिवलीत स्थायिक झाले.
डोंबिवलीत १९९२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातून सलग सात-सात वर्षे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी शिकून विशारद झाले, तर काही संगीत अलंकार झाले. काही विद्यार्थ्यांनी संगीतविशारद परीक्षेत मुंबईतून पहिला येण्याचा मानही पटकावला आहे. पारंपरिक शास्त्रीय संगीत कलेचा नव्या आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यास हे या विद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. सध्या अलंकार परीक्षेपर्यंतचे मार्गदर्शन किरण फाटक या विद्यालयाच्या माध्यमातून करतात. तसेच अखिल भारतीय गांधर्व मंडळाकडून त्यांना परीक्षा केंद्राची मान्यताही मिळाली आहे. भारतीय संगीत विद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे विद्यार्थ्यांची तुकडी त्यांच्या आवाजानुसार ठरवली जाते. मंचावर आपली कला सादर करताना वाटणारी भीती घालविण्यासाठी विद्यालयातर्फे मासिक संगीत सभाही घेण्यात येते.
शास्त्रीय संगीत मैफलींसाठी कला मंच
आता शास्त्रीय संगीताला फारसे व्यासपीठ उपलब्ध नाही. दूरचित्रवाणी माध्यम या कलेची दखल घेत नाही. रेडिओवरील शास्त्रीय संगीत मैफलींनाही फारसा श्रोता वर्ग नाही. कार्यक्रमालाही फारसे प्रेक्षक नसतात. शिवाय कार्यक्रमाचा खर्चही प्रचंड वाढला आहे. छोटय़ा व नाव नसलेल्या कलाकारांना प्रायोजक मिळत नाहीत, अशा परिस्थितीत भारतीय संगीत विद्यालयाच्या जोडीला २००४ साली भारतीय संगीत कला मंचची स्थापना करण्यात आली. गेली दहा वर्षे विविध शिबिरे, मैफिली यांचे आयोजन मंचच्या वतीने केले जाते. नवनव्या कलाकारांना मंच मिळावा या हेतूने त्यांनी भारतीय संगीत कला मंच या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेद्वारे अनेक नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच नामवंत गायकांच्या मैफिलींचे आयोजनही केले जाते.
नव्या बंदिशींची रचना
बंदिशी हा शास्त्रीय संगीताचा अविभाज्य घटक आहे. अठराव्या शतकात संस्कृतसोबतच अनेक भाषांत शेकडो बंदिशी बांधल्या गेल्या. कलावंत बंदिशीमार्फत विविध अंगांनी रागाचे दर्शन घडवितो. बंदिश या विषयाची व्यापकता लक्षात घेऊन किरण फाटक यांनी बंदिशीचे सूक्ष्म व चौफेर निरीक्षण करून त्यावर पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा विद्यालयातील तसेच भारतीय बंदिशीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. शास्त्रीय संगीतात बंदिशी या ब्रज, हिंदी किंवा उर्दू भाषेत असतात. फाटक यांनी २५ बंदिशी मराठीत रचल्या आहेत. तर शास्त्रीय संगीतात पंरपरेने गायल्या जाणाऱ्या काही बंदिशी इंग्रजी भाषेत रचून फाटक यांनी अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये बंडखोरीचे निशाण उभारले आहे. या बंडखोरीचे क्रांतीत रूपांतर होईल असा विश्वास त्या वेळी सुप्रसिद्ध गायक अरुण कशाळकर यांनी व्यक्त केला होता. इंग्रजी भाषेत दहा बंदिशी असून त्या भैरव, तोडी, भूप, यमन, केदार, हमीर, खमाज, मारू, बिहाग, दुर्गा आणि मालकंस या रागांवर आधारित आहेत. मारू बिहागमधील व्हेन आर यु कमिंग, भूप रागातील प्ले कृष्णा प्ले, स्वीट फ्ल्युट आदी बंदिशींसोबतच व्हॉट ए कूल, प्लेझंट अ‍ॅटमॉसपियर ही केदार रागातील बंदिश आज तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे.
संगीत नाटकांचा प्रसार
जवळपास ५० ते ६० वर्षे संगीत नाटकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविल्यानंतर कालांतराने संगीत नाटकाला उतरती कळा लागली. विद्याधर गोखले यांच्या निधनानंतर नवीन संगीत नाटके रंगभूमीवर आलीच नाहीत. जुनी संगीत नाटके करण्यास कोणी धजावत नाहीत. एकाच ठिकाणी चार तास बसून नाटक पाहण्यास प्रेक्षकांना वेळ मिळत नाही. त्यात चांगल्या संहिताची वानवा आहे. चांगले मेहनती गायक कलाकार या क्षेत्राकडे वळेनासे झाले आहेत. अशी खडतर परिस्थिती असली तरी संगीत नाटकाची मोहिनी काही प्रमाणात नाटय़रसिकांच्या मनावर आजही आहे. ही परंपरा जगवण्याची, रुजवण्याची त्यास मोठे करण्याची इच्छा असणाऱ्या संस्था आजही कार्यरत आहेत. तरुणांमध्ये संगीत नाटकाबद्दल आवड निर्माण करण्याचे कार्य संगीत विद्यालय नेटाने करीत आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगीत नाटय़ाविषयी आवड असून अनेक नाटकांतील नायकाच्या भूमिका ते लीलया पार पाडत आहेत.