वाहतूक शाखेकडून आराखडा तयार; बेकायदा रिक्षा वाहनतळांवर कारवाईचे संकेत

डोंबिवली पूर्व-पश्चिम, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसराची वाहतूक कोंडीच्या कचाटय़ातून मुक्तता करण्यासाठी वाहतूक शाखेने विस्तृत आराखडा तयार केला असून त्यानुसार रिक्षा वाहनतळांचे योग्य नियोजन, रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत रिक्षा वाहनतळ हटविणे तसेच नेहमीच गजबजलेल्या चौकांमध्ये दर्शक यंत्रणा बसविण्यासारखी कामे या माध्यमातून होणार आहेत. तसेच वाहतूक सेवकांची संख्या वाढवताना वाहतुकीचे नियोजनदेखील केले जाणार आहे.

डोंबिवलीतील वाहतूक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. त्यात बेकायदा रिक्षा वाहनतळांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभिरे यांनी तातडीने पालिकेचे अभियंता प्रमोद मोरे, रोहिणी लोकरे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, परिवहनचे आगार व्यवस्थापक संदीप भोसले, ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर, पोलीस मित्र, रिक्षा संघटनेचे अंकुश म्हात्रे, यांची एक समिती स्थापन केली आहे.

अहवालातील तरतुदी

  • डोंबिवली, ठाकुर्ली, चोळे, एमआयडीसी परिसरातील रिक्षा वाहनतळांवर शिस्तीत उभ्या राहाव्यात यासाठी वाहनतळांच्या रांगेत लोखंडी अडथळे उभे करावेत.
  • महापालिकेने डोंबिवली पश्चिमेत गोपी सिनेमा चौक, दीनदयाळ चौक, सम्राट चौक, पूर्व भागात दत्तनगर चौक, प्रगती महाविद्यालय, डॉ. शिरोडकर रुग्णालय मानपाडा रस्ता, चार रस्ता, शेलार चौक, एस. के. पाटील शाळा, घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा चौक अशा शहरातील मुख्य रस्त्यांवर दर्शक (सिग्नल) बसवावेत.
  • केळकर रस्ता, बाजीप्रभू चौकातील रिक्षा वाहनतळ पाटकर रस्त्यावर स्थलांतरित करणे तसेच पालिकेच्या डोंबिवली कार्यालयाबाहेरील, केळकर रस्त्यावरील वृंदावन हॉटेलसमोरील रिक्षा वाहनतळ हटविण्यात यावे.
  • शिवमंदिर, टंडन रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवणे. डोंबिवली पूर्व भागातून येणारी वाहने टंडन रस्त्याने पश्चिमेत जातील, अशी व्यवस्था करणे तसेच पश्चिमेतील वाहने केळकर रस्ता, शिवमंदिर रस्त्याने पुढे निघून जातील असे नियोजन करणे. शिवाय रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या सम,-विषम नियमांची कडक अंमलबजावणी करणे.
  • खासगी कंपन्यांच्या बस टिळक पुतळ्याजवळील स्टेट बँक येथून टाटा लाइनमार्गे मॉडर्न प्राइड हॉटेलवरून मानपाडा रस्त्याने परतीच्या प्रवासाला जातील.

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना, रिक्षा संघटना प्रतिनिधींचे म्हणणे, वाहतूक नियोजनाचे समितीने सुचविलेले उपाय या सर्वाचा एक समग्र एकत्रित प्रारूप अहवाल वाहतूक विभागाने तयार केला आहे. त्यानुसार वाहतूक नियोजनात महापालिका, आरटीओ, वाहतूक विभाग अशा जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

गौतम गंभिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग