कल्याण आगाराची रेल्वे स्थानकाकडील प्रवेशद्वारे बंद करण्याचा निर्णय
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीला आमंत्रण देणारे एस.टी बस आगाराचे प्रवेशद्वार बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात येणाऱ्या स्थानिक बसना महालक्ष्मी हॉटेल ते जरीमरी नाला (आर्चिस इमारत) या दिशेने प्रवेशद्वार ठेवण्याचा प्रस्ताव महामंडळाने पुढे आणला आहे. हे करत असताना स्थानकासमोरील प्रवेशद्वारे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडून यासंबंधीचा प्रस्ताव गेली वर्षे महामंडळापुढे ठेवण्यात येत होता. या मागणीची पूर्तता होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा भार मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्याच्या विविध भागातून लांब पल्ल्याच्या बसगाडय़ा कल्याणमधील वाहतूक कोंडी भेदत रेल्वे स्थानकाजवळील आगारात येतात. शहरात अगोदरच रिक्षा, खासगी वाहने, पादचारी, केडीएमटी, ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसगाडय़ांची गर्दी असते. त्यात राज्य परिवहनच्या बसेस शहरात येत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. हे आगार कल्याण रेल्वे स्थानकाला खेटून आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारा प्रवाशांचा सततचा लोंढा, रस्त्यावर उभे राहून वाहतूक करणाऱ्या रिक्षा, पादचारी या सगळ्या गोंधळात कल्याण रेल्वे स्थानक परिसर म्हणजे एक वाहतूक कोंडीचे बेट होऊन बसले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर कल्याण रेल्वे स्थानकाजवळील आगाराची प्रवेशद्वारे महालक्ष्मी हॉटेल व जरीमरी नाल्यावरून करणे आवश्यक आहे, अशी सूचना वाहतूक विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी यापूर्वीच एका पाहणीदरम्यान केली होती. महापालिकेच्या भविष्यवेध प्रकल्पात आगाराचे खडकपाडा भागात स्थलांतर करून रेल्वे स्थानकाबाहेरील आगाराच्या जागेत स्थानिक परिवहन उपक्रम, रिक्षा वाहनतळ या सार्वजनिक सुविधांसाठी सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे.
या पाश्र्वभूमीवर आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक, परिवहन विभागाचे नितीन करटकर, वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सयाजी डुबल, प्रभारी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी सोडवून हा परिसर सुटसुटीत करणे किती आवश्यक आहे, हे आमदार पवार यांनी बैठकीत सांगितले. कल्याण आगारात धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, जुन्नर, मंचर, अहमदनगर, नाशिक, सातारा, सोलापूर, पुणे भागातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस येतात. याशिवाय कल्याण आगारातून भिवंडी, मुरबाड, ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करतात. आगारासाठी कल्याण शहराबाहेर खडकपाडा भागात एक राखीव भूखंड आहे. त्या जागेवर आगाराची उभारणी केली तर लांब पल्ल्याच्या जेवढय़ा बस शहरात येतात, त्या सर्व बसेस शहराबाहेरच्या आगारात येतील आणि बाहेरूनच निघून जातील. त्यामुळे बसचा इंधन खर्च, कोंडीमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल, असे आमदार पवार यांनी सुचविले. भिवंडी, मुरबाड, ग्रामीण भागातील स्थानिक
प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाच्या बस कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील आगारातून सुटतील, असे पवार यांनी सूचित केले.

आमदारांच्या सूचनांची दखल
आमदार पवार यांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री देशमुख यांनी कल्याण शहराबाहेर आगार विकसित करण्यासाठी (डेपो पोर्ट) एक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश परिवहन अधिकाऱ्यांना दिले. तसेच, आगार स्थलांतर व इतर आवश्यक बाबींसाठी मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आगाराची प्रवेशद्वारे रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहेत ती बंद करून जरीमरी नाल्यावर स्लॅब टाकून तेथून बसची वाहतूक सुरू करावी, अशा सूचना देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.