व्यवसायाची नोंदणी नसल्याने व्यवसाय कराला फाटा;
ठाणे शहरात
दीड लाखांहून अधिक जणांकडे व्यवसाय परवाना नसल्याचा अंदाज
ठाणे शहरातील सुमारे दीड लाखांहून अधिक डॉक्टर, सीए, वकील, विविध कंपन्यांचे खासगी सल्लागार आणि दुकानदारांनी विक्री कर विभागाकडे व्यवसायाची नाव नोंदणीच केली नसल्याची माहिती पुढे येत असून त्यामुळे राज्य सरकारचा एकटय़ा ठाणे शहरातून सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा कर बुडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्र सरकारच्या विक्री कर विभागाने संपूण जिल्ह्य़ातील अशा व्यावसायिकांचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले असून संपूर्ण जिल्ह्य़ातून व्यवसाय कर बुडविणाऱ्यांचा आकडा पाच लाखांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोणत्याही प्रकारचा स्वंयरोजगार अथवा दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्रधारकांना कायद्याने व्यवसाय कर भरणे बंधनकारक आहे. डॉक्टर, सीए, विमा प्रतिनिधी, वकील यांनाही व्यवसाय कर भरणा करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरात एक लाखांहून अधिक व्यावसायिकांनी विकी कर कायद्याच्या माध्यमातून अशी नोंदणी केली आहे. साधारणपणे वर्षांला २५०० रुपये इतका व्यवसाय कर भरावा लागतो. कराचा भरणा केल्यानंतरच दुकाने अथवा आस्थापना चालविण्याची परवानगी दिली जाते. असे असताना ठाणे शहरातील सुमारे दीड लाख व्यावसायिकांनी अद्याप विक्री कर विभागाकडे कराची नोंदणीच केली नसल्याचे उघड होत आहे.
व्यावसायिकांची ही करचुकवेगिरी राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी ठाणे तसेच आसपासच्या शहरातील नोंदीत थकबाकीदार तसेच नोंदणीच न केलेल्या व्यावसायिकांचे विक्री कर विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार नोंदीत नसलेल्या व्यावसायिकांचा संपूर्ण जिल्ह्य़ातील आकडा पाच लाखांच्या घरात असण्याची शक्यता या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना दिली. थकबाकीदार तसेच नोंदीत नसलेल्या व्यावसायिकांमध्ये डॉक्टर, सीए, वकिलांचाही समावेश मोठय़ा प्रमाणावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेवटची संधी
साधारणपणे २००८ ते २०१६ या कालावधीत व्यावसाय कराची नोंदणी न केलेल्यांचे प्रमाण बरेच मोठे आहे. त्यामुळे या आठ वर्षांतील व्यवसाय कराची मूळ रक्कम २० हजार रुपये इतकी आणि दंड ५८४० अशी एकूण २५८४० रुपयांचा व्यवसाय कर भरणे यापूर्वी बंधनकारक होते. मात्र सप्टेंबर २०१६ पर्यंत करासाठी नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांना तीन वर्षांची ७५०० इतकीच रक्कम भरावी लागणार आहे. व्यवसाय करापोटी वर्षांला अडीच हजार रुपयांचा भरणा करायचा असतो. मात्र ही रक्कम न भरणाऱ्यांचा आकडा मोठा आहे, अशी माहिती ठाण्याचे व्यवसाय कर अधिकारी डॉ. किवद क्षीरसागर यांनी ठाणे लोकसत्ताला दिली. तीन वर्षांसाठी ७५०० रुपयांची अभय योजना जाहीर करून सरकारने सलग पाच वर्षांचा कर आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे तरी व्यावसायिकांनी नोंदणी करून अभय योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरही नोंदणी करून पैसे भरणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.