डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन; ‘मार्ग यशाचा’ उपक्रमाला दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद
आपले करिअर कोणत्याही एका विषयावर अथवा परीक्षेवर अवलंबून नसते. जीवनात विविध वळणांवर आपल्याला अनेक संधी मिळत असतात. त्यातून योग्य तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. मात्र मिळालेल्या त्या संधीचे सोने करण्यासाठी परिश्रमाची किंमत मोजावी लागते. एका अपयशाने सर्व काही संपले असे समजण्याचे काहीच कारण नाही. त्या संधीचे सोने करण्यासाठी आपल्याला विशिष्ट किंमत मोजावी लागते. त्यामुळे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य उपभोगतानाच विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी गुरुवारी ठाण्यात केले. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात डॉ. नाडकर्णी यांच्या ‘ताणरहित व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावरील व्याख्यानाने झाली.
करिअर निवडताना असणाऱ्या अनेक पर्यायांमधून अचूक निर्णय कसा निवडावा, अभ्यासाच्या ताणाचे व्यवस्थापन करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्तिमत्त्व विकास, स्वप्न आणि करिअर यांमधील फरक समजून घेताना कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील संधींचा उलगडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे पालक-विद्यार्थ्यांना झाला. निर्णयावरील अढळ निष्ठा आत्मविश्वासाला बळ देत असते. करिअर हे केवळ माहितीसाठी नाही. केवळ माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. मिळालेल्या माहितीचे मर्म विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. जगण्याचा अर्थ समजण्यासाठी जो करिअरकडे वाटचाल करेल तो खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असे नाडकर्णी यांनी सांगितले. तसेच स्वप्न आणि करिअर यातील फरक विद्यार्थ्यांनी समजायला हवा. करिअरपेक्षा स्वप्न मोठी असतात. कठीण परिस्थितीतसुद्धा स्वप्न पाहणे थांबवू नका. नवीन शिकण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी. पालकांनी आपल्या पाल्याचा अभिमान बाळगावा. त्यांनी विशिष्ट शाळा-महाविद्यालयात शिकून आपल्याला हवे तेवढे गुण मिळवावेत, ही पालकांची अपेक्षा चुकीची आहे. शाळा-महाविद्यालये नव्हे तुमची मुले तुमची ब्रॅण्ड आहेत, असे मार्गदर्शन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी विद्यार्थी-पालकांना केले.

’ ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत लोकसत्ता मार्ग यशाचा हा कार्यक्रम विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने पार पडला. सपोर्टेड बाय ‘युक्ती’, पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘पारुल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’, आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या लोकसत्ता मार्ग यशाचा उपक्रमाचे नॉलेज पार्टनर ‘आयटीएम’ आहेत.