दुर्मीळ होत चाललेला ‘युरेशियन कालवफोडय़ा’ या परदेशी पाहुण्यांचे पक्षिनिरीक्षकांना वसईच्या किनारपट्टीवर दर्शन झाले. या पक्ष्यांची उपस्थिती कमी होत चालली असून त्यांच्या तुरळक नोंदी आहेत. मात्र वसईत मोठय़ा प्रमाणावर युरेशियन कालवफोडे दिसल्याने पक्षिप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

‘नेस्ट’चे सदस्य मोहन कटवी आणि डॉ. विनोद शर्मा हे नेहमीप्रमाण वसईतील अर्नाळा-आगाशी समुद्रकिनारी पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना युरेशियन कालवफोडय़ा या पक्ष्यांचे दर्शन झाले. नेहमीपेक्षा या पक्ष्यांची संख्या जास्त असल्याचे या वेळी निदर्शनास आले. एकूण ५० युरेशियन कालवफोडय़ा लाटांच्या कडेने उदरभरण करताना दिसले. यापूर्वी पक्षी अभ्यासक अमोल लोपीस यांना दातिवरे समुद्रकिनारी युरेशियन कालवफोडय़ा दिसले होते. महाराष्ट्रात आतापर्यंत एकाच वेळी ३०च्यावर कालवफोडे दिसलेले नाहीत. त्यामुळे अर्नाळा किनारपट्टीवर दिसलेल्या या दुर्मीळ पक्ष्यांचा आकडा सुखावह आहे.

कालवफोडय़ांची वैशिष्टय़े

* हे पक्षी हिवाळ्यातच या किनाऱ्यावर नेहमी हजेरी लावतात.

* बघताक्षणी नजरेत भरणारा हा पक्षी टिटवीपेक्षा थोडा मोठय़ा आकाराचा असून काळसर पांढऱ्या वर्णाचा आहे.

* युरोपमध्ये बर्फवृष्टी झाली की पक्ष्यांना अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवते, त्यामुळे ते भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधात स्थलांतर करतात.

*  खेकडे, शिंपले, मासे या जलचर जीवांवर ते उदरनिर्वाह करतात.

‘पक्ष्यांना त्रास देऊ नका’

अर्नाळा, आगाशी, रानगाव, भुईगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर हिवाळ्यात मोठय़ा प्रमाणावर परदेशी स्थलांतरित पाणपक्ष्यांचे आगमन होते. या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी स्थानिक लोकांनी, प्रशासनाने, तसेच किनाऱ्यावर भेट  देणाऱ्या पर्यटकांनी घेतली पाहिजे. किनाऱ्यावर भरधाव गाडी चालविणे, मोठमोठय़ाने ओरडणे, पक्ष्यांना दगड मारणे, मोठय़ा आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणे असे प्रकार टाळले पाहिजेत, असे आवाहन नेस्टचे अध्यक्ष आणि पक्षी अभ्यासक यांनी केले आहे.