शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरेने व्यक्त केली. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येबद्दल मकरंद म्हणाला की, ‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. गेल्यावर्षी तूरडाळीला १३ हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला भाव यंदा केवळ ५ हजार रुपये प्रति क्विंटल इतका झाला. मोठ्या प्रमाणात झालेल्या भाव घसरणीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं.’  शेतकऱ्यांना नुकसान झालं तरी खासगी सावकार आणि बँका त्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचं मकरंद ठाण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाला.

[jwplayer EgmlUHgT]

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सरकारी योजनेबद्दल तो म्हणाला, सरकारच्या वतीने खास करून शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविली जाते, परंतु त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचताच नाहीत. त्यातच लग्नाच्या वेळेस हुंडा मागितला जातो. पोटापुरती मिळकत असणारी जमीन विकली जाऊ नये, याकरीता लग्न न करता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याची खंत मकरंदने व्यक्त केली. यावेळी त्याने नुकत्याच झालेल्या शीतल वायाळ तसेच मोहिनी भिसे यांच्या आत्महत्येची उदाहरणे देखील दिली. शेतकऱ्यांच्या मुलींच्या आत्महत्येसाठी सामूहिक विवाहाचा पर्याय समोर आला पाहिजे असे त्यांने सांगितले.

राज्यातील जलशिवार योजनेच्या यशाबद्दल मकरंद म्हणाला की, ‘या योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील दुधगाव तसेच शिरूर कासार या ठिकाणी आता शेती पिकली आहे.’ यावेळी त्याने मराठवाडा आणि कोकणातील शेतीपद्धती सांगून कोकणात पर्याय आहेत तर केवळ कोरडवाहू शेती मराठवाडा किंवा विदर्भात असल्याचेही सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील जोडधंदा दिला पाहिजे असं तो म्हणाला.

[jwplayer REuXNNJq]