डॉक्टरांच्या हलगर्जीने नवजात बालकाचा मृत्यू

उपचारादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर हलगर्जी केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, ग्राहक मंचाने या बालकाच्या माता-पित्यांना चार लाख ४० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश संबंधित डॉक्टरांना दिला आहे.

कल्याण येथे राहणारे कृपेश मोरे यांच्या पत्नीवर डॉ. संजय गोडबोले यांच्या कल्याण पश्चिम येथील श्री हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पराग पाटील यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृपेश मोरे यांच्या पत्नीची सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी त्यांच्या गर्भाशयातील गर्भजल कमी झाल्याचे डॉ. पराग पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मोरे यांच्या पत्नीला अ‍ॅमिनोड्रिप नावाची तीन इंजक्शन्स घेण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार दुसऱ्या इंजेक्शननंतर पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचे मोरे यांनी पराग पाटील यांना सांगितले. मात्र काळजीचे काही कारण नाही असे सांगून तिसरे इंजेक्शनही त्यांना देण्यात आले. तिसऱ्या इंजेक्शननंतर त्यांना ताप आला. यावेळी मोरे यांनी डॉक्टरांना दूरध्वनी करून पत्नीला भरपूर ताप असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉ. पराग पाटील यांनी रुग्णाला न तपासता केवळ दूरध्वनीवरून एक विशिष्ट गोळी घेण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांना बरे वाटले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हॉस्पिटल येथे त्यांनी पत्नीला दाखल केले. त्यानंतर गोडबोले यांनी उपचार केल्यानंतर पत्नीचा ताप कमी झाला. मात्र प्रसूतीकळा आल्याने डॉ. पराग पाटील आणि डॉ. गोडबोले यांनी दोघांनी मिळून सकाळी साडेअकरा वाजता सीझर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर तीन तासानंतर सीझर केले. यावेळेत बाळाने गर्भाशयात शौच केले. मोरे यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. मात्र यावेळी शौच पोटात गेल्याने बाळाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचे रुग्णालयातील बालरोगज्ज्ञ डॉ. आशीष पाटील यांनी मोरे यांना लगेचच सांगितले नाही. त्यानंतर रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला डॉ. आनंद इटकर यांच्या यशोधन रुग्णालयात हलवावे लागेल याची कल्पना दिली. परंतु त्यादरम्यान बाळाची प्रकृती चिंताजनक झाली आणि बाळाचा मृत्यू झाला.

याबाबतीत दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रे यांचा आढावा घेऊन ग्राहक मंचाने उपरोक्त निर्णय दिला. त्यानुसार सर्व संबंधित डॉक्टरांनी मिळून चार लाख ४० हजार रुपये भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.