जिन्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांमध्ये संताप; रांगा लावण्याचे प्रकार सुरू

बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पडण्याच्या चोरवाटा रेल्वे प्रशासनाने नुकत्याच बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे रुळावरचा प्रवास थांबला असला तरी अपुरे जिने आणि त्यामुळे होणारी गर्दी यामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यासाठी प्रवासी रूळ ओलांडून स्थानकाबाहेर पडत होते. अनधिकृत फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनीही रेल्वे रुळाशेजारी आपला बाजार मांडला होता. अनेकदा रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे या चोरवाटा बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यावर कारवाई करत रेल्वेतर्फे कर्जतच्या दिशेच्या मच्छी मार्केटजवळील दोन चोरवाटा तसेच फलाट क्रमांक एकजवळील संरक्षक भींतीचे भगदाड लोखंडी जाळीने बंद केले. मात्र त्यामुळे फलाट क्रमांक एक आणि दोन वरील जिन्याकडे हे प्रवासी वळल्याने त्यावर मोठय़ा प्रमाणावर ताण पडतो आहे. जिन्यांवर चढण्यासाठी अक्षरश: मोठय़ा रांगा लागत असल्याने दिवसभरात थकून भागून आल्यानंतर इथेही रांग लावायची का असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन हे सर्वाधिक वर्दळीचे असतात. कर्जतकडे जाणाऱ्या लोकल आणि बदलापूरला येणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकल फलाट क्रमांकएकवरून सुटत असतात. त्यामुळे या फलाटांवर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. मात्र या फलाटाची रुंदी ही कमी आहे. तसेच त्यावरून बाहेर पडणारे जिनेही अरुंद असल्याने त्यावर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे असून अडचण, नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती प्रवाशांची झाली आहे.

स्वयंचलित जिना चुकीच्या ठिकाणी
बदलापूर रेल्वे स्थानकाची स्वयंचलित जिन्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, मात्र हा जिना वर्दळीच्या फलाट क्रमांक एक आणि दोनवर न बसवता फलाट क्रमांक तीनवर लावण्यात येत आहे. त्यामुळे वर्दळीचे फलाट सोडून तिथे जिन्याचे काय काम असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता जागेच्या कमतरतेमुळे स्वयंचलित जिना तिसऱ्या फलाटावर टाकण्यात आला असून, हा तांत्रिक मुद्दा असल्याचे नारायण शेळके यांनी सांगितले.

मुळात गर्दी फलाट क्रमांक एक आणि दोनवर असते, पण जिना तिसऱ्या फलाटावर कशाला हवा आहे. जागेचीच अडचण असेल तर प्रवाशांना दुसरा पर्याय द्यावा.
-मंगेश चव्हाण, प्रवासी