पालघर जिल्ह्यात १२३ मद्यपी चालकांवर कारवाई; पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून वाहनचालविणाऱ्यांविरोधात पोलीस व वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश आले. पालघर जिल्ह्यात केलेल्या कारवाई तब्बल १२३ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी १०२ चालक वसई-विरार शहरातले आहेत. मीरा-भाईंदर शहरातही मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

३१ डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून अनेक जण वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताची मोठी शक्यता असते. त्यासाठीच पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून जनजागृतीे मोहीम हाती घेतली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी करून मद्यपी चालकांची तपासणी केली. संपूर्ण पालघर जिल्ह्यात १२३ मद्यपी सापडले. त्यापैकी वसई-विरार शहरातील १०२ मद्यपी होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात पाठविले आहे.

डिसेंबर महिन्यात पालघर जिल्ह्यात ३३८ मद्यपींवर कारवाई करण्यात आली होती. त्यात वसईतल्या २२६ जणांचा समावेश होता. त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपयांचा दंड वसून करण्यात आला होता. या कारवाईसाठी पोलिसांनी संतोष भुवन, बोळिंज, साईनाथ नाका, मनवेल पाडा, बाभोळा, पंचवटी, रेंज नाका, तुळींज नाका आदी ठिकाणी नाकाबंदी लावली होती. वाहतूक विभागातले तीन अधिकारी आणि ३२ कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात आले होते. पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्वत: गस्त घालून शहरात पाहणी करीत होते.

अभिनव प्रयोग यशस्वी

केवळ तळीरामांवर कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नव्हता. मद्यपान करून कुणी वाहन चालवू नये, असा पोलिसांचा प्रयत्न होता. त्यासाठी यंदा पोलिसांनी अनोखा प्रयोग केला होता. त्याबाबत माहिती देताना वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित पवार यांनी सांगितले की, आम्ही सर्व हॉटेल चालकांचीे बैठक बोलावली होती. कुणी ग्राहकाने मद्यपान केले आणि तो जर वाहनाने जात असेल तर त्यांना वाहन चालविण्यास न देता त्यांना पोहोचविण्यासाठी तुमचा चालक द्यावा, असे सांगण्यात आले होते. अनेक हॉटेलचालकांनी आपले चालक आणि वाहन मद्यपीग्राहकांना घरी पोहोचवत होते. यामुळे मोठा फरक पडल्याचे ते म्हणाले.