अपूर्वा महिला सामाजिक संस्था, ठाणे
ठाण्यातील अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या वतीने सध्या महिलांना मोटार प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या मंगळवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात या उपक्रमाचे उद्घाटन  झाले. त्यानिमित्ताने गेली ११ वर्षे कचरावेचक महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्याचा आढावा..

ठाणे शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा वेचण्याचे काम करणारा महिला वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. या वर्गाच्या प्रश्नांकडे समाजाचे दुर्लक्ष झाले होते. या क्षेत्रात काम करण्याची निकड लक्षात घेऊन २००४ साली ठाण्यातील विद्या शिंदे यांनी अपूर्वा महिला सामाजिक संस्थेची स्थापना केली. गेल्या दशकभरात संस्थेने अबला महिलांचे सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविले. त्यातूनच ही संस्था आता निराधार महिलांसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.रोजचे धकाधकीचे आयुष्य जगत असताना समाजातील उपेक्षितांच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र मनातील ती संवेदनशीलता वेळेअभावी तसेच नक्की काय करायचे हे माहिती नसल्याने तशीच राहते. त्याला कृतिशीलतेची जोड मिळत नाही. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. विद्या शिंदे यांनी तसे पुढाकार घेतला. विद्या शिंदे यांचे शिक्षण ग्रामीण भागात कऱ्हाड येथे झाले. संसार सांभाळताना लहानपणापासूनच असलेली समाजसेवेची आवड विद्या शिंदे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कचऱ्या वेचणाऱ्या महिलांची परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवली होती. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या महिलांसाठी काहीतरी विधायक काम करायला हवे, या उद्देशाने ठाण्यात राहत असलेल्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांसाठी काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. यातूनच अपूर्वा सामाजिक संस्थेची उभारणी झाली. कचरा वेचणाऱ्या बहुतेक महिला निरक्षर होत्या. त्यांच्यासाठी विशेष वर्ग भरवून संस्थेने त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकविले. त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट कशी करावी, कचऱ्यात काम करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे त्यांना प्रशिक्षण दिले. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षण शिबिरात ठाण्यातील सुमारे ८०० दहा कचरावेचक महिलांनी सहभाग नोंदवला. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करणे, त्यापासून खत तयार करणे यांसारखे प्रशिक्षण या शिबिरातून देण्यात आले. केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांनी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील वेगवेगळ्या इमारतींमध्ये या महिलांना कचरा गोळा करण्याचे काम दिले. थोडक्यात या प्रशिक्षणातून त्यांना रोजगारही मिळाला. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८०० हून अधिक महिलांना कचरा वेचण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून २५० महिलांना साक्षर करण्यात आले आहे.आता या संस्थेच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम करण्याचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला मोटार प्रशिक्षण शिबिरामार्फत एक हजार रुपये इतक्या माफक दरात इंग्रजी बोलणे, कराटे प्रशिक्षण, वाहतुकीचे नियम, तसेच लायसन्स काढून देणे या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ३० महिलांचा वर्ग तयार होऊन त्यांचे लवकरच प्रशिक्षण सुरू होणार आहे. भविष्यात विद्या शिंदे यांची संस्थेच्या माध्यमातून निराधारांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची इच्छा आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण विद्यार्थिनींना नर्स असिस्टंट तसेच परावैद्यकीय विभागातील इतर कौशल्यांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहेत
दारिद्रय़रेषेखालील महिलांसाठी आधार केंद्र
या संस्थेच्या माध्यमातून दारिद्रय़ रेषेखालील महिलांसाठी महापालिकेच्या आधार केंद्र उपक्रमाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करण्यात आले. या बचत गटाच्या माध्यमातून बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले. तसेच शेवया बनवण्याच्या आणि मसाला कुटण्याचे यंत्र त्यांना उपलब्ध करून दिल्याने आज अनेक महिला याचा उपयोग त्यांच्या व्यवसायासाठी करत आहेत.
समुपदेशन, प्रबोधन
संस्थेचे नाव महिला सामाजिक संस्था असले तरी समाजातील प्रत्येक दुर्बल घटकासाठी विद्या शिंदे अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. कुष्ठरोग निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत अनेक कुष्ठरोग्यांना भेटून त्यांनी हा आजार बरा होऊ शकतो, असा दिलासा त्यांना दिला. ठाण्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांनी बालमजूर कामगारांवर बंदी आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. स्वत: काम करत असताना ठाणे महानगरपालिकेचे काही उपक्रम विद्या शिंदे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली. महानगरपालिकेचे समुपदेशन केंद्र चालविले. कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रमाणासंदर्भात लक्ष देऊन अत्याचारीत व पीडित महिलांचे समुपदेशन केले. या महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवण्यासाठी बॅंकेचे व्यवहार, स्वाक्षरी करण्यास शिकवले. रात्र निवारा केंद्राच्या माध्यमातून तीन वर्षे या उपक्रमात भिकारी, निराधार लोकांसाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेने केले. ठाणे जिल्’ाातील विविध जिल्ह्य़ांमध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबवून पाणी वाचवा हा संदेश देण्यात आला. तसेच शहर स्वच्छता मोहीम अंतर्गत पथनाटय़, कौटुंबिक हिंसाचार याबाबत जनजागृती केली.
पुरस्कार
संस्थेच्या माध्यमातून विद्या शिंदे यांनी केलेल्या विविध कामांची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले. २००५ मध्ये त्यांना जिल्हास्तरीय डॉ. अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच समाजभूषण, निलकंठ, महिला सक्षमीकरण आदी पुरस्कार त्यांना लाभले. संस्थेच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. जपान, न्यूझीलंड, स्पेन या देशातील कार्यकर्त्यांनी संस्थेने राबविलेल्या उपक्रमांना भेट दिली आहे.

Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय
Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal with Amit Palekar
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या रडारवर गोव्यातील आप नेते; कोण आहेत अमित पालेकर?