जागोजागी माहितीचे फलक; पहिल्याच दिवशी प्रवाशांची झुंबड
कल्याण स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोमवारी वायफाय सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वायफाय सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने आवश्यक माहितींचे पोस्टर स्थानकात जागोजागी चिकटवले होते. त्यावरून माहिती घेऊन प्रवासी मोबाइल फोनमध्ये मोफत वायफाय सुविधेचा लाभ घेताना दिसून येत होते. रेल्वेकडून वायफायची सुविधा घेणारे कल्याण हे जिल्ह्य़ातील एकमेव स्थानक असून पुढील टप्प्यात ठाणे स्थानकात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी या सुविधेचे दादर येथून उद्घाटन केले. वायफाय सेवेमुळे स्थानक परिसरात असताना प्रवाशांना सुरुवातीचे ३० मिनिटे जलदगतीने इंटरनेट वापरणे शक्य होणार आहे, तर त्यानंतर या सुविधेचा वेग कमी होऊन एक तासाने सेवा खंडित होणार आहे, अशी माहिती कल्याण स्थानक व्यवस्थापक प्रभातकुमार दास यांनी दिली. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी रेल्वेच्या वतीने विशेष सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पायाभूत सुविधा आणि विशेष सुविधांची उपलब्धता प्रवाशांना करून देण्यात आली. या वेळी कर्जत आणि शहाड येथील नव्या पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे स्थानकातील डिलक्स टॉयलेट आणि कल्याण स्थानकातील स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्याक्रमात मध्य रेल्वेच्या तीन महत्त्वाच्या स्थानकांमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये कल्याण, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वेकडून वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले कल्याण हे ठाणे जिल्ह्य़ातील पहिले स्थानक असून पुढील टप्प्यात ठाणे स्थानकातही ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. यापूर्वी कळवा-मुंब्रा स्थानक परिसरात खाजगी स्वरूपात वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मात्र कालांतराने ती बंद पडली. कल्याण स्थानकात सोमवारी सुरू झालेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. फलाट क्रमांक एकवर स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर या सुविधेची माहिती लावण्यात आली होती. त्यानुसार वायफाय सुविधेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

वाय-फाय सेवा कशी वापराल?
* स्मार्टफोन धारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कल्याण स्थानकात प्रवेश केल्यानंतर वायफाय सुरू केल्यानंतर ही सेवा जोडली जाईल.
* इंटरनेट वापरण्यास सुरुवात केल्यानंतर मोबाइलवर नोंदणी करण्यासाठीचे विंण्डो सुरू होईल. त्यावर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर एक पिन क्रमांक येईल.
* पिन क्रमांक विण्डोमध्ये टाकल्यानंतर वायफाय सेवा सुरू होईल.
* पहिल्या अर्धातास चांगला वेग वापरकर्त्यांना मिळेल तर त्यानंतर त्याचा वेग मंदावेल. त्यानंतर एका तासानंतर ही सेवा खंडीत होईल.

प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेटची आवश्यकता असते. कल्याण स्थानकात ती पूर्ण होऊ शकेल.
– प्रभातकुमार दास, स्थानक व्यवस्थापक, कल्याण.