गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नायगाव येथे दुर्मीळ प्रजातीचे मृदू कवचाची कासवे दिसू लागले आहेत. पावसाळ्यातले दोन महिने या कासवांचा विणीचा मोसम असल्याने ती पाण्याबाहेर येत असतात.

इंडियन फ्लॅप शेल टर्टल म्हणजेच भारतीय मृदू कवचाची कासवे गोडय़ा पाण्यात आढळतात. एरव्ही ती पाण्यात असतात, पण पावसाळा सुरू झाला की ती पाण्यालगतच्या ओलसर भागात येतात. वसईच्या नायगाव येथे स्थानिकांना काही मृदू कवचाची कासवे आढळून आली आहेत. जून आणि जुलै महिन्यात त्यांचा विणीचा हंगाम असल्याने ही कासवे पाणथळ जागेच्या आजूबाजूला संचार करत होती. या कासवांची २० ते २५ पिल्ले एकत्रित आढळून आली. ही पिल्ले कोणाच्या पायाखाली येऊन चिरडू नयेत म्हणून नायगाव येथील अमेय गवारी, निर्भय ठाकूर, मंथन चौधरी, निहार चोरघे या तरुणांनी पुढाकार घेऊन त्यांना जवळच्या पाणथळ जागेत नेऊन सोडले.

ही कासवे मुख्यत: दक्षिण आशियामध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळून येतात. दलदलीच्या ठिकाणी, तलाव या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. त्यांची लांबी तीन फुटापर्यंत असून मासे हे त्यांचे खाद्य असते. या कासवांचा खाद्य म्हणून वापर होत असल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात तस्करी करण्यात येते, असे प्राणी अभ्यासक सचिन  मेन यांनी सांगितले.

जून आणि जुलै महिन्यांत या कासवांच्या विणीचा हंगाम असल्याने वृक्षारोपण करताना खणलेल्या खड्डय़ात आढळून आल्यास त्या खड्डय़ास पुन्हा वरच्या वर बुजवावे आणि खड्डे खणताना काळजी घ्यावी. ते घराजवळ सापडल्यास त्यांना जवळच्या पाणथळ जागेवर सोडावे.

– सचिन मेन, प्राणी अभ्यासक