वसई-विरार महापालिकेचा नवा उपक्रम; विविध ठिकाणी यंत्रे

उत्तम दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन महिलांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सॅनिटरी नॅपकिन यंत्रे बसवण्यास सुरुवात केली आहे. ‘स्टेपअप इंडिया’ या संस्थेच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात येत आहे. अवघ्या ५ रुपयांत एक सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. महापालिकेने सध्या रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात ही यंत्रे बसवली असून शहरात विविध ठिकाणी ती बसवण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना महागडे नॅपकिन घेणे परवडत नाही, त्याशिवाय ते सहज उपलब्ध होत नाहीत. यासाठी विविध ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन यंत्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘स्टेपअप इंडिया’ ही सामाजिक संस्था सॅनिटरी नॅपकिनसाठी जनजागृती करते. त्यांनी हे सॅनिटरी नॅपकिन यंत्र तयार केले आहे. त्यांच्या सहयोगाने शहरातील विविध ठिकाणी ही यंत्रे बसवली जाणार आहेत.

पाच रुपयांचे नाणे टाकल्यावर एक नॅपकिन बाहेर येतो. ही यंत्रे प्रायोगिक तत्त्वावर सध्या पालिकेचे तुळींज रुग्णालय, वसईतील सर डीएम पेटीट रुग्णालय तसेच सातिवली आणि धानिव येथील आरोग्य केंद्रात बसवण्यात आली आहेत. या यंत्रांमध्ये नॅपकिन भरणे आणि देखभालीचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील विविध भागांत अशा प्रकारची सॅनिटरी नॅपकिन यंत्रे बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याबाबत जनजागृती करत आहोत. महिलांना अयोग्य नॅपकिन आणि नॅपकिन न मिळणे ही समस्या असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही हे यंत्र विकसित केले आहे. अवघ्या १६ हजारांतील हे यंत्र कुठेही लावले तर महिलांना पटकन उत्तम दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन मिळू शकतील.

स्वप्निल शिर्सेकर, स्टेपअप इंडिया