– जू न हा आकाश निरीक्षणाचा अखेरचा महिना! यानंतर सुमारे चार महिने आकाश अभ्राच्छादित राहील. परंतु या चार महिन्यांत आपण आकाश निरीक्षणाची विशेष माहिती घेणार आहोत.
– जून महिन्यात रात्री नऊ-दहाच्या सुमारास पूर्व क्षितिजावर श्रवण तारका उगवलेली दिसेल. वृश्चिक राशीतील नक्षत्र-तारका पूर्व आकाशात सुंदर दर्शन देतील. मध्य आकाशात स्वाती तारका ठळक दर्शन देईल. पश्चिम क्षितिजावर पुनर्वसू नक्षत्र मावळत असेल. मघा नक्षत्र पश्चिम आकाशात दर्शन देईल. उत्तरेस ध्रुव तारकेच्या वरच्या बाजूला सप्तर्षीचे दर्शन होईल.
* उल्कावर्षांव- २० जून रोजी रात्री बारापासून मध्य आकाशात भुजंगधारी तारकांसंघातून उल्कावर्षांव होईल.
* चंद्र – मंगळवार दि. २ जून रोजी रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा समाप्त होईल. मंगळवार दि. १६ जून रोजी ज्येष्ठ अमावास्या समाप्त होईल. अधिक आषाढ महिन्याची नूतन चंद्रकोर गुरुवार दि. १८ जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर दिसेल. तिचे उत्तरेकडील शृंग जास्त उंच दिसेल.
* बुध ग्रह- बुध ग्रह १० जूनपर्यंत सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. ११ जूनपासून बुध ग्रह दररोज सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व क्षितिजावर दर्शन देईल.
* शुक्र ग्रह- तेजस्वी शुक्र ग्रह दररोज रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दर्शन देईल.
* मंगळ ग्रह- मंगळ ग्रह सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे जून महिन्यात दिसू शकणार नाही.
* गुरू ग्रह- गुरू ग्रह रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात आश्लेषा नक्षत्रात दिसेल.
* शनी ग्रह- शनी ग्रह दररोज रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात अनुराधा नक्षत्रात दर्शन देईल.

जून महिन्यातील खगोलीय घटना
* दिनांक- खगोलीय घटना
* २ जून- चंद्र-शनी युती. शनी चंद्राच्या दोन अंश दक्षिणेस दिसेल.
* ६ जून- शुक्र परमइनांतरावर
* १० जून- चंद्र पृथ्वीच्या जवळ (३ लक्ष ६९ हजार ७११ कि.मी.)
* १५ जून- चंद्र-बुध युती. बुध चंद्राच्या एक अंश उत्तरेस. पहाटे पूर्वेस दिसतील.
* १५ जून- चंद्र रोहिणी युती. रोहिणी चंद्राच्या एक अंश दक्षिणेस. पहाटे पूर्वेस दर्शन होईल.
* २० जून- चंद्र-शुक्र युती. शुक्र चंद्राच्या सहा अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दिसतील.
* २१ जून- चंद्र-गुरू युती. गुरू चंद्राच्या पाच अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात दर्शन होईल.
* २१ जून- दक्षिणायनारंभ. मोठा दिवस (१३ तास १४ मिनिटे)
* २३ जून- चंद्र पृथ्वीपासून दूर (४ लक्ष ४ हजार १३२ कि.मी.)
* २४ जून- बुध-रोहिणी युती. बुध रोहिणीच्या दोन अंश उत्तरेस. पहाटे पूर्व क्षितिजावर दर्शन होईल.
* २९ जून- चंद्र-शनी युती. शनी चंद्राच्या दोन अंश दक्षिणेस. रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होईल.