शाळेच्या बाकावरून
आपल्या संस्कृतीत माता-पिता, गुरुजन, मातृभूमी यांच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी, अशी शिकवण आपली संस्कृती देते. योग्य व्यक्तीची निवड करून योग्य कारणासाठी कोणतीही अपेक्षा न करता, लाभाचा विचार न करता मदत करावी, असा व्यापक विचार मांडणारी आपली भारतीय संस्कृती म्हणूनच गौरवली जाते. समाजातील काही संस्था, व्यक्ती या दृष्टीने जागरूकपणे कार्य करीत असतात आणि जाणीवपूर्वक सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात.ब्राह्मण सोसायटी परिसरातील ब्राह्मण सेवा संघ ही संस्था सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असणारी संस्था म्हणून ओळखली जाते. विविध स्वरूपांची धार्मिक कार्ये, मंगलकार्ये, सांस्कृतिक उपक्रम यांच्या माध्यमातून संस्थेला जे उत्पन्न प्राप्त होते त्यापैकी काही रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी व्यतीत करण्याचे संस्थेने निश्चित केले. ठाण्यामधील हुशार पण आर्थिकदृष्टय़ा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य करण्याच्या उद्देशाने शिक्षण निधीच्या माध्यमातून मदत दिली जाऊ लागली आणि त्यासाठी शिक्षण साहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली. ६९ सालापासून सुरू झालेल्या या शिक्षण निधीचा लाभ आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.अगदी प्रारंभीच्या काही वर्षांमध्ये ब्राह्मण समाजातील हुशार पण गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, शिक्षण पूर्ण होण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने कार्यास प्रारंभ झाला. त्या काळी शाळेची फी भरणेही शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी साहाय्य केले जात असे. पुढे मग सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या. फी माफीचे धोरण राबवण्यासही प्रारंभ झाला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांऐवजी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्य केले जाऊ लागले. कालांतराने संस्थेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि आर्थिक साहाय्य केवळ ब्राह्मण समाजापुरते मर्यादित न ठेवता हिंदू समाज (सर्व जाती, पोटजाती) असा बदल करण्यात आला. याशिवाय शिक्षण साहाय्यक समितीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत अनेकविध वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करताना, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असा व्यापक विचार या उपक्रमांमागे दिसून येतो.शालान्त परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यात त्यांना उत्तम यश प्राप्त व्हावे म्हणून मार्गदर्शनपर व्याख्यानमालिका ठाण्यात प्रथम सुरू करण्याचे श्रेय समितीकडे जाते. (७१-७२) वासंतिक वर्ग सुरू करण्याची कल्पनादेखील या समितीची. पुढे मग शाळा-शाळांतून वासंतिक वर्ग चालविले जायचे आणि त्याचे शिक्षकांचे मानधन समिती देत असे.संस्कृत विषयाच्या संवर्धनाकरिता संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते. संस्कृत शिष्यवृत्ती हा एक महत्त्वाचा उपक्रम आणि त्यासाठी संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षा समितीने सुरू केली. गेल्या वर्षी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे ३०० विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. ७वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेतली जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी समितीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. परीक्षेच्या आधी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्कृत पाठांतर स्पर्धा, सामूहिक गीतापठण स्पर्धा, संस्कृत वक्तृत्व स्पर्धा इ. विविध स्पर्धाचे आयोजनही केले जाते. संस्कृत सुभाषितांचे महत्त्व कळावे म्हणून सुभाषितांवर आधारित स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. विद्यार्थ्यांना १० ते १२ सुभाषिते दिली जातात आणि त्यापैकी एकाची निवड करून त्यांनी रसग्रहण करायचे असते. इ. ८वी ते इ. १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केली जाते. समितीतर्फे शंकराचार्य जयंती, शिक्षक दिन, संस्कार व्याख्यानमाला असे उपक्रमही राबविले जातात. २३ जानेवारी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. या दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन २३ जानेवारीपूर्वी ३ दिवस शाळा-शाळांतून विद्यार्थ्यांसाठी संस्कार व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून ब्राह्मण सेवा संघ आणि शिक्षण साहाय्यक समिती कार्यरत आहे. यापैकी एक विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे समाजातील हुशार, पण गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य करणे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी व्यवस्थापकीय, कायदेविषयक अशा उच्च शिक्षणाकरितादेखील साहाय्य केले जाते. याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेकडे एक अर्ज भरून द्यावा लागतो. हे अर्ज २ आणि ३ सप्टें. रोजी संस्थेच्या कार्यालयात (ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा ठाणे) रात्री ९ ते १० या वेळेत दिले जाणार आहेत. इच्छुकांनी अर्ज मिळविण्यासाठी येताना प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यासंदर्भातील कागदपत्रे म्हणजे कॉलेजचे ओळखपत्र, फी भरल्याची पावती, गुणपत्रक, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला हे आणणे अत्यावश्यक आहे. साधारणपणे १०वी उत्तीर्ण होताना ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि १२वी उत्तीर्ण होताना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. उच्चशिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड नसावा आणि एटीकेटी नसावी. अर्ज भरल्यानंतर समितीतर्फे अर्जाची छाननी होते आणि विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते. २ ऑक्टोबर रोजी या विद्यार्थी आणि पालक यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विशेषत्वाने नमूद करण्याजोगी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना विनापरतावा आर्थिक साहाय्य केले जाते.ठाण्यातील काही दानशूर व्यक्ती ब्राह्मण सेवा संघाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाकरिता नेमाने मदत करीत असतात. दिवंगत पी. के. जोशी यांच्यासारख्या रेल्वेत नोकरी करणाऱ्या ठाणेकराने समाजासमोर उदाहरण घालून दिले आहे. दरवर्षी ४ विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत ते करतात. आपल्या पश्चात ते कार्य सुरू राहील याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अधिक मदतीची गरज असते त्यांना अशा व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्न करते.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !