बारवी, आंद्र धरणातील पाणीसाठा खालावल्याने प्रशासनाच्या हालचाली
अपुऱ्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपातीला सामोरे जात असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांना फेब्रुवारीपासून आठवडय़ातून तीन दिवस पाणीकपातीला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी आणि
टाटाच्या आंद्र धरणात जेमतेम जलसाठा उरला असल्याने फेब्रुवारीपासून ३० ऐवजी ४० टक्के पाणीकपात करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात
आज, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे ठाणे परिसरातील शहरांना पाणीपुरवठा करताना संबंधित प्रशासनांना बरीच कसरत करावी लागत असून येत्या जून-जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहावा, यासाठी या शहरांमध्ये आठवडय़ातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली असून आता आणखी एक दिवस पाणीकपात करण्याच्या विचाराप्रत संबंधित प्राधिकरणे आली आहेत. यासंदर्भात शुक्रवारी ठाण्यातील सिंचन भवनात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कल्याण-डोंबिवली महापालिका आदी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एमआयडीसीच्या बारवी धरणात सध्या ११५ दशलक्ष घनमीटर, तर टाटा धरणात ११० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा शिल्लक असून यापैकी प्रत्येकी दहा दशलक्ष घनमीटर पाणी डेडस्टॉक म्हणून ठेवले जाते. साधारण १२१ दिवसांसाठी १८८.७६ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. उपलब्ध साठय़ानुसार १५ जुलैपर्यंत जेमतेम पुरेल एवढेच पाणी सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कपात लागू केली जाण्याची शक्यता आहे.