ठाणे महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर व पाणी बिल भरत नसलेल्या आणि थकबाकीदार असणाऱ्यांच्या दारी महापालिकेच्या वतीने बॅण्डबाजा पाठवून त्यांच्याकडून कर वसुली करून घेण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मालमत्ता कर आणि पाणी बिल वसुलीकरिता शुक्रवारी आयोजित बैठकीमध्ये थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे थकबाकीदारांच्या दारी आता करवसुलीसाठी पालिकेचा बॅण्डबाजा दाखल होणार आहे.
मालमत्ता कर आणि पाणी बिल वसुलीचे २०१५-१६ चे ठरवलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या वेळी थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच मालमत्ता कर व पाणी बिल थकीत आहेत, अशांच्या नळजोडण्या तोडून कराचा भरणा होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा चालू करू नये. खंडित करूनही नळजोडणी पुन्हा जोडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, असे निर्दश त्यांनी दिले.
जो मालमत्ताधारक मालमत्ता कर आणि पाणी बिल भरत नसेल अशा मालमत्तांच्या मलनि:सारण वाहिन्या महापालिकेच्या मलनि:सारण वाहिन्यांना जोडल्या असल्यास त्याही खंडित करा. वीजपुरवठा खंडित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस पत्र देऊन कळवा. मोठय़ा थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रात आणि शहरात होर्डिगवर प्रसिद्ध करा. मालमत्ता कर पाणी बिल न भरणाऱ्या अनिवासी मिळकती जप्त करणे, असे कडक आदेश महापलिका आयुक्तांनी या वेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.