१३१ पैकी अवघे २८ नगरसेवक पदवीधर

महाराष्ट्राचा एक प्रमुख सांस्कृतिक चेहरा असा लौकिक असणाऱ्या ठाण्यातील स्थानिक प्रशासनात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांची शिक्षणाच्या आघाडीवर बोंब असून १३१ पैकी फक्त २८ नगरसेवक पदवीधर आहेत. उर्वरित १०३ नगरसेवक अर्धशिक्षित आहेत. त्यातील काहीजण बारावी तर काहीजण जेमतेम दहावी उत्तीर्ण झाले आहेत. नॉनमॅट्रिक उमेदवारांबरोबरच एक अशिक्षित उमेदवारही निवडून आला आहे. पालिकेत आता पुरुष लोकप्रतिनिधींपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या अधिक आहे. ६४ पुरुष  उमेदवार, तर ६७ महिला उमेदवार निवडले गेले आहेत. राष्ट्रवादीचे केणीदाम्पत्य सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.  या दोघांनी मिळून तब्बल १२० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणातील चारपैकी तिघेजण निवडून आले तर एकाला मात्र पराभव स्वीकारावा लागला.

ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये ५० विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत तर २७ विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. त्यामध्ये माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, विद्यमान उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण अशा मात्तब्बरांचा समावेश आहे. ३३ प्रभागातील एकूण १३१ जागांपैकी ६७ जागांवर महिला तर ६४ जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत २० ते ४० वयोगटातील ३० उमेदवार निवडून आले आहेत तर उर्वरित ४० ते ६५ वयोगटातील उमेदवार आहेत. दिवा भागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या अंकिता पाटील या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका असून त्या २३ वर्षांच्या आहेत. बाळकुम प्रभागातून निवडून आलेले शिवसेनेचे देवराम भोईर हे सर्वात वयस्कर नगरसेवक असून ते ६५ वर्षांचे आहेत. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक मुकुंद केणी यांची संपत्ती ६६ कोटी रुपये, तर त्यांच्या पत्नी प्रमिला केणी यांची मालमत्ता ६७ कोटी इतकी आहे. ते ठाणे महापालिकेत निवडून गेलेले सर्वात श्रीमंत दाम्पत्य आहे.

कलंकित उमेदवारांचे अष्टक

यंदा निवडणूक प्रचारात कलंकित उमेदवारांचा मुद्दा बराच गाजला होता. यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोपांची चिखलफेक केली. निवडणूक आयोगानेही मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची इत्यंभूत माहिती देताना त्यात त्यांच्यावरील गुन्ह्य़ांचा तपशील नोंदविला होता. तरीही ठाण्यात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद असलेले आठ उमेदवार निवडून आले आहेत. त्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे.

शिवसेना..

* गुरमुखसिंग स्यान (प्रभाग क्रमांक १६ – क)

गुन्हे- बनावट नाणे तयार करणे (२३२), दरोडा (३९५)

* माणिक पाटील (प्रभाग १६ – ड)

गुन्हे – खुनाचा प्रयत्न (३०७).

* दीपक वेतकर (प्रभाग क्रमांक १८ – अ)

गुन्हे – घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे (३२४), जबरी चोरी (३९०)

* गणेश कांबळे (प्रभाग क्रमांक ९ – अ)

गुन्हे- खुनाचा प्रयत्न (३०७), घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे (३२४), जबरी चोरी (३९२).

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष..

* नजीब मुल्ला (प्रभाग क्रमांक १० – अ)

गुन्हे- फसवणूक करणे (४२०), मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (४०३), बनावट मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र इत्यादीचे बनावटीकरण (४६७), आत्महत्येस प्रवृत्त करणे (३०६)

* हनुमंत जगदाळे (प्रभाग क्रमांक ६- ड)

गुन्हे – आत्महत्येस प्रवृत्त करणे (३०६)

भाजप..

* मुकेश मोकाशी (प्रभाग क्रमांक-अ)

गुन्हे – अपहरण (३६३)

काँग्रेस..

* विक्रांत भिमसेन चव्हाण (प्रभाग क्रमांक ७ – ड)

गुन्हे- आत्महत्येस प्रवृत्त करणे (३०६).