ठाणे वाहतूक पोलिसांमार्फत शहरातील अंतर्गत मार्गात वर्तुळाकार बदल करण्यात येत असल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हे बदलही वरवरचे ठरू लागले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वच मार्गाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून मध्यंतरी काही संस्थांमार्फत तसा अभ्यासही पूर्ण करत आणला आहे.
शहर नियोजनाची ठोस आखणी केल्याशिवाय यासारखे उपाय म्हणजे वरवरची मलमपट्टी ठरण्याची शक्यता अधिक आहे. महापालिका क्षेत्रात उभी राहणारी गृहसंकुले, आयटी पार्क, मॉल आणि अन्य वास्तू उभ्या राहत असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटिल होण्याची चिन्हे आहेत. त्या वेळी वाहतूक व्यवस्था अधिक गुंतागुंतीची होऊ नये म्हणून महापालिकेने आताच पावले उचलण्याची गरज आहे. ठाणे शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा अहवाल मध्यंतरी प्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केला होता. शहरातील महत्त्वाचे रस्ते अरुंद असल्याने या कोंडीत भर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडल्याचा मोठा फटका ठाणे, मुंब्रा, शीळ भागातील महामार्गावरील वाहतुकीला बसला. या महामार्गावरून प्रवास करणारी अवजड वाहने खड्डय़ांमध्ये अडकून पडल्याने त्यांच्या मागे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. त्यामुळे शीळ फाटा मार्गावर तर तब्बल पाच तास वाहतूक कासवगतीने सुरू होती. तसेच याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली-नारपोली रस्त्यावरही टँकर आणि सॅन्ट्रो कारच्या अपघातामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली होती. ठाण्यातील विवियाना मॉलने मध्यंतरी सेल जाहीर केल्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. तसेच नाशिकला कुंभमेळा आणि शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या वाहनांचा ताण शहरावर वाढला आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होताच त्याचे परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जाणवतात. मुंबई-नाशिक महामार्गाला भेदून जाणाऱ्या तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी ही तिन्ही जंक्शन्स आता वाहतूक कोंडीची नवी आगारे झाल्याचे चित्र आहे.
वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही समस्या अधिकाधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि सर्वच मार्गाचा सविस्तर शास्त्रीय अभ्यास करून त्याआधारे वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
वाहतुकीचा शास्त्रीय अभ्यास..
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील काही चौकांमध्ये वर्तुळाकार (रोटरी) पद्धतीने बदल करण्यास सुरुवात केली आहे. तीन पेट्रोल पंप, कोपरी, गीता सोसायटी आदी भागांतील वाहतूक मार्गात असे बदल करण्यात आले आहेत. मात्र वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने हे बदल वरवरचे ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने सविस्तर अभ्यास करून त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी केंद्र शासनाच्या दिल्ली येथील फरिदाबादमधील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रॅफिक एज्युकेशन’ या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत शहरातील महत्त्वाच्या चौकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला. या चौकांमध्ये नितीन कंपनी, कोपरी स्थानक, टॉवर नाका, कळवा पूल आदी भागांचा समावेश होता. तसेच या अभ्यासाद्वारे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा अहवाल पथक देणार होते. त्यानुसार वाहतूक नियोजनासाठी हा अहवाल महापालिका प्रशासनाकडे देण्यात येणार होता. मात्र हा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे.
चौक कोंडीमुक्त उपक्रम..
ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांतील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘एक चौक.. एक समस्या’ या उपक्रमामध्ये २२ ठिकाणांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत या चौकांचा आकार लहान करणे, फेरीवाले तसेच अतिक्रमणे हटवणे, ‘नो पार्किंग’ क्षेत्र जाहीर करणे, दुभाजक बसवणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे बस थांबे स्थलांतरित करणे, आदी उपाय करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ठाणे शहरातील दादा पाटीलवाडी परिसर, गावदेवी चौक ते आंबेडकर चौकापर्यंतचा मार्ग, तीन हात नाक्याजवळील सेवा रस्ते, नितीन जंक्शनकडून अल्मेडा चौकात जाणारा मार्ग व सेवा रस्त्यावरून काजूवाडीकडे जाणारा मार्ग, कामगार हॉस्पिटल ते यशोधननगपर्यंतचा मार्ग, गोल्डन डाइज नाका, कासारवडवली जंक्शन, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जी.पी.ओ. ते जेल रोड मार्ग, मुंब्य्रातील कल्याण फाटा आदी भागांची निवड करण्यात आली असून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत.
वाहतुकीच्या शास्त्रीय अभ्यासासाठी केंद्र
ठाणे वाहतूक पोलिसांनी कल्याण शहरामध्ये वाहतुकीचे संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच आसपासच्या शहरांतील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे शक्य होणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या नव्या केंद्रात ठाण्यासह राज्यातील वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यासोबत वाहतुकीचा शास्त्रोक्त अभ्यास कसा करावा, याचे धडेही दिले जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत सुव्यवस्था आणण्यासाठी हे केंद्र केवळ ठाणे जिल्ह्यासह अवघ्या राज्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
उड्डाणपुलांचा उतारा..
ठाणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोखले मार्गावरील नौपाडा भागात, मीनाताई ठाकरे चौक आणि अल्मेडा चौक अशा तिन्ही भागांत मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली असून यातून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी उड्डाणपुलांचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्यासंबंधी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, आता हे तिन्ही उड्डाणपूल एमएमआरडीएमार्फत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिकेने त्यास मान्यता देऊ केली आहे. त्यामुळे या तिन्ही भागांत उड्डाणपूल उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी अरुंद रस्त्यांवर उड्डाण पूल उभारण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवीत काही नागरिकांकडून त्यास विरोध होऊ लागला आहे. तसेच कॅडबरी ते वर्तकनगर हा प्रवास आता ठाणेकरांसाठी दिव्य ठरू लागला आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी आता नित्याची झाली आहे. त्यामुळे या मार्गावरही उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र काही महिन्यांनंतर हा प्रस्तावही मागे पडला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यापूर्वी शहराच्या वाहतुकीचा शास्त्रीय अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.