एखाद्या दुर्घटनेतून कोणी आश्चर्यकारकरीत्या बचावले तर आपण ‘काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती’ असे सहजपणे म्हणून जातो. ठाण्यातील नौपाडय़ात सोमवारी मध्यरात्री ‘कृष्णा निवास’ ही इमारत कोसळून त्यात मृत पावलेल्यांची कहाणी पाहून मात्र ‘काळ आला होता आणि वेळही’ असेच म्हणण्याची वेळ सर्वावर आली. या दुर्घटनेतील काही मृतांच्या बाबतीत घडलेल्या विचित्र योगायोगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. निवृत्तीनंतर ठाण्यातील लोढा संकुलातील नव्या घरात राहायला गेलेले अरुण सावंत तेथे मन रमत नसल्याने या इमारतीत पुन्हा वास्तव्यास आले आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली. सावंत यांची पाच वर्षांची नात अनया ही वाढदिवसाच्याच मध्यरात्री दगावल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. सावंत यांच्याच शेजारी राहणारे रामचंद्र भट यांची चार दिवसांपूर्वी माहेरपणासाठी आलेली मुलगी रश्मी मांगे हिचाही या दुर्घटनेत अंत झाला.
नौपाडय़ातील कृष्णा निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रामचंद्र भट, त्यांची पत्नी मीरा, मुलगी रचिता, भाऊ सुभराव आदी राहत होते. सोमवारी मध्यरात्री ही इमारत कोसळली आणि या सर्वाचा त्यात मृत्यू झाला. रामचंद्र यांची विवाहित मुलगी रश्मी मांगे दुबईमध्ये वास्तव्यास होती. केवळ चार दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती, मृत्यूच्या या तांडवात तिचाही बळी गेला. भट यांच्याच शेजारी राहणारे अरुण सावंत यांची कहाणी तर आणखी हृदयद्रावक. भारतीय आयुर्विमा महामंडळातून सहायक विभागीय व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कृष्णा निवासचे तीन मजले चढणे शक्य होत नसल्याने त्यांनी ठाण्यातच लोढा कॉम्प्लेक्समध्ये घर घेतले होते. तिथे ते चार वर्षांपूर्वी राहण्यासाठी गेले. मात्र त्या नव्या जागी मन रमत नसल्यामुळे महिनाभरापूर्वी ते पुन्हा कृष्णा निवासमध्ये सहकुटुंब परतले. हा निर्णय त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. या दुर्घटनेत त्यांचेही कुटुंब उद्ध्वस्त झाले. सावंत यांच्यासह त्यांची मुलगी भक्ती, मुलगा अमित, नात अनया (५) यांचाही मृत्यू झाला. त्यांचे जावई अमित खोत मात्र या अपघातातून बचावले.
तिसऱ्या मजल्यावर राहणारे अरविंद नेने (८०) आणि त्यांची पत्नी मीरा (७०) हे दोघे ढिगाऱ्याखाली सापडले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने सर्वात प्रथम अरविंद आणि मीरा यांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र मीरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर माधव बर्वे हे भाजपचे कार्यकर्ते राहत होते. सध्या त्यांच्याकडे ठाणे कार्यालय मंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यांची पत्नी गोव्यात, तर मुलगा सिंगापूरमध्ये वास्तव्यास असल्याने ते एकटेच होते. त्यांचाही मृत्यू झाला.
कामगारांना वाचवले, पण मुलगी गेली कृष्णा निवास इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यात अमृतलाल लक्ष्मीचंद पटेल हे गेल्या १५ वर्षांपासून चहा तसेच पोहे विक्रीचा व्यवसाय करीत असून वर्षभरापूर्वी ते इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहण्यास आले होते. पत्नी आशा, मुलगी प्रिया (१४) असा त्यांचा परिवार. त्यांच्यासोबत त्यांचे कामगार रमेशचंद्रा मेधा, मोहन नेओजी, शंकर खेनाजी हे तिघेसुद्धा राहत होते. सोमवारी रात्री इमारतीचे प्लॅस्टर पडू लागले, त्या वेळी त्यांना धोक्याचा अंदाज आला. त्यानंतर काही क्षणांतच इमारत कोसळू लागताच त्यांनी पत्नी, मुलगी आणि तिन्ही कामगारांना हाताने घट्ट पकडले. मात्र त्या वेळी त्यांची मुलगी प्रिया हिचा हात सुटला आणि ती खाली पडली. काही तासांनंतर या सर्वाना ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात आले. या दुर्घटनेत मात्र त्यांच्या प्रियाचा मृत्यू झाला. मुलीला वाचवू न शकल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. दुर्घटनेच्या दिवशी सायंकाळी या इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत आमच्यात चर्चा झाली होती. मात्र ती कोसळेल असे वाटले नव्हते, असे अमृतलाल यांनी सांगितले.

रोकड, दागिने सापडले
इमारतीचा ढिगारा उपसून त्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागातील जवानांच्या हाती काही रोकड आणि दागिने लागले. मात्र, हे दागिने कुणाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नसून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत.

कबुतर आणि मांजरीचे प्राण वाचले
नौपाडय़ातील कृष्णानिवास इमारतीचा ढिगारा उपसून त्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तब्बल सात तासानंतर ढिगाऱ्याखाली एक माजंर जिवंत अवस्थेत सापडले. या अपघातात मांजराचे पाठीमागचे पाय जखमी झाले होते. त्यामुळे त्याला निटसे उभे रहाता येत नव्हते. तसेच भेदरलेल्या अवस्थेत होते. तसेच एका कबुतरही जखमी अवस्थेत सापडले असून त्याच्या पंखांना जखम झाली होती. या दोघांनाही उपचारासाठी पशु आणि प्राणी रुग्णालयात नेण्यात आले.

तिचा अखेरचा वाढदिवस..
रामचंद्र भट यांची मुलगी रश्मी हिचा विवाह करण मांगे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वीच झाला होता. वर्तकनगरचा मूळ रहिवासी असणारा करण हा दुबईत नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. चार दिवसांपूर्वीच रश्मी आणि करण ठाण्यातील घरी आले होते. काही कामानिमित्त करण गुजरातला गेला होता, तर रश्मी ही सासरीच राहत होती. अरुण सावंत यांची मुलगी भक्ती आणि रश्मी या दोघी लहानपणीच्या मैत्रिणी होत्या. तसेच त्यांच्या कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते होते. भक्तीची मुलगी अनया हिचा ३ ऑगस्ट रोजी पाचवा वाढदिवस होता. त्यामुळे या वाढदिवसाकरिता रश्मी माहेरी आली होती. सावंत यांचा मुलगा अमित हा नोकरीनिमित्ताने अमेरिकेत असतो. तोसुद्धा वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घरी आला होता. सोमवारी रात्री भट आणि सावंत कुटुंबीय एका हॉटेलमध्ये अनयाचा वाढदिवस साजरा करून घरी परतले. त्यानंतर रात्री उशिरा रश्मी आणि तिच्या मावशीचे फोनवर बोलणेही झाले. वाढदिवसाच्या सुखद अनुभवातून जात असतानाच या कुटुंबांसाठी ही अखेरची रात्र ठरली.