युपीतून विना तिकीट ठाण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणीने सोमवारी कळवा खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंदनी शिवचरण गुप्ता असे या तरुणीचे नाव आहे. पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीला वाचवण्यात यश आले. तरुणीला कळवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस तरुणीला सामाजिक संस्थेकडे सोपविणार असल्याची माहिती पालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी विनायक जाधव यांनी दिली. नंदनी ही उत्तर प्रदेश राज्यातील रामनगर परिसरात राहणारी आहे. ती घरातून पळ काढून विनातिकीट रेल्वे प्रवास करत ठाण्यापर्यंत पोहोचली. नैराश्येत असलेल्या या तरुणीने कळवा खाडी पुलावर आल्यानंतर प्रथम हातातील सामान खाडीत टाकले. त्यानंतर स्वत: उडी घेण्याच्या प्रयत्नात असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला पाहिले. त्यांनी सुरक्षा रक्षकांकरवी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर तिला कळवा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. पालिका सुरक्षा अधिकारी जाधव यांना तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने आपल्याच पित्याच्या शारीरिक त्रासाला कंटाळून घरातून पळ काढला आहे. तरुणीने हातातील सामान खाडीत टाकल्याने तिच्या कुटुंबियांचे मोबाइल नंबर न मिळाल्याने त्यांच्याशी  संपर्क साधता आला नसल्याचेही पालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी जाधव यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास कळवा पोलीस करत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीला सामाजिक संस्थेच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.